महाबीजचे बियाणे भरले कमी अन् खड्यांनी गमावली हमी; 30 किलोच्या बॅगीत इतके ग्रॅम खडेच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महाबीजने सोयाबीन बियाण्याच्या 30 किलोच्या बॅगची किंमत 390 रुपयांनी वाढविली आहे.

अकोला : महाबीजच्या 30 किलोच्या सोयाबीन बियाणे बॅगीत आधिच 300 ते 400 ग्रॅम बियाणे कमी भरले असून, बियाण्यात सुद्धा 150 ते 200 ग्रॅम मातीचे खडे निघत असल्याची तक्रार, कौलखेड जहाँगीर येथील शेतकरी ज्ञानेश्वर कडू व सुनिता गावंडे यांनी केली आहे. शिवाय या बियाण्याची क्लिनिंग, ग्रेडिंग करण्यात आली की नाही, याबाबत सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महाबीजने सोयाबीन बियाण्याच्या 30 किलोच्या बॅगची किंमत 390 रुपयांनी वाढविली आहे. परंतु, शेतकऱ्यांची संस्था असल्याने इतर कंपन्यांच्या तुलनेत महाग असूनही, महाबीजचे बियाणे खरेदी केले. मात्र घरी नेऊन या बॅगींचे वजन केले असता, त्यात 500 ते 800 ग्रॅम बियाणे कमी भरल्याची आपबीती कौलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितली होती.

महत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

आता पाऊस पडल्यानंतर बियाण्याला औषध लावण्यासाठी त्याच बॅग सोडून ताडपत्रीवर टाकल्या असता, प्रतिबॅग 150 ते 200 ग्रॅम मातीचे खडे आढळून आल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर कडू व सुनिता गावंडे यांनी सांगितले. शिवाय या बियाण्याचे क्लिनिंग, ग्रेडिंग झाले असते तर, खडे निघालेच नसते, त्यामुळे या बियाण्याचे क्लिनिंग ग्रीडिंग करण्यात आलेच नसावे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रतिबॅग एक किलो बियाणे कमी
बॅग उघडण्यापूर्वी 30 किलो सोयाबीन बियाण्याच्या बॅगीचे वजन 500 ते 800 ग्रॅम कमी भरले होते. त्यातही 150 ग्रॅम वजन थायरम पावडरचे आणि 400 ग्रॅम बारदान्याचे वजन असून, बियाणे उघडून पाहाले असता त्यात 150 ते 200 ग्रॅम मातीचे खडे निघाले आहेत. त्यामुळे प्रतिबॅग 1000 ते 1150 ग्रॅम बियाणे कमी असल्याचा आरोप कौलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांची किती मोठी लूट
एका बॅगीत एक ते सव्वा किलो सोयाबीन बियाणे कमी भरत असल्यास, लाखो क्विंटल बियाणे विक्रीतून महाबीजने शेतकऱ्यांची किती मोठी लूट केली असावी. शिवाय या प्रकारामुळे हे बियाणे उगवेल की नाही, यावरही अविश्वास निर्माण झाला आहे. हे महामंडळ शेतकऱ्यांचे असल्याचा विश्वास महाबीजने गमावला तर, बाकी खासगी बियाणे कंपन्यावर शेतकऱ्यांनी कसा विश्वास ठेवावा.
- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less filled with Mahabeej seeds in bag farmers complaint at akola district