esakal | अरे असं कसं रुजू तर झाले पण आलेच नाहीत...कोरोनाच्या धसक्यामुळे अशीही स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

doctor banner.jpg

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमी मोठी समस्या आहे.

अरे असं कसं रुजू तर झाले पण आलेच नाहीत...कोरोनाच्या धसक्यामुळे अशीही स्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. मनुष्यबळाची ही कमी भरून काढण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात आली होती. त्यानुसार ४१ परिचारीका आणि २३ वर्ग चारचे कर्मचारी नियुक्तीनंतर रुजूही झालेत. मात्र, कोरोनाच्या धसक्यामुळे यातील काही कर्मचारी पुन्हा आलेच नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमी मोठी समस्या आहे. अशातच कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरील रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. मनुष्यबळाची तुट भरुन काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत परिचारीका आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविली होती.

आलेल्या अर्जांमधून ४१ परिचारीका, तर २३ वर्ग चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सर्वोपचार रुग्णालयात रुजूही झालेत. परंतु, कोरोनाच्या धास्तीनंतर दोन-तीन दिवसांच्या सेवेनंतर पुन्हा आलेच नसल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही संख्या जास्त आहे, हे विशेष. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कायमच आहे.

स्वच्छतेची समस्या कायम
सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमी आहे. त्यामुळे सकाळी स्वच्छता झाली की, पुन्हा रात्रीच स्वच्छता केली जात असल्याची माहिती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे वर्ग चारची २४ कंत्राटी पदेही भरली. परंतु, यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी रुजू झाल्यानंतर पुन्हा उपस्थिती लावलीच नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे येथील स्वच्छतेची समस्या कायमच आहे.