लॉकडाउनमध्ये मजुरांना दिला रोजगार; अनलॉकमध्ये त्यांनीच नाकारले हक्काचे काम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

मजुरांना 100 दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेकडे (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरवली आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात योजनेअंतर्गत 4 हजार 400 पर्यंत मजुरांना रोजगार देणाऱ्या सदर योजनेला आता मजुरच पाठ दाखवत आहेत. 

अकोला : मजुरांना 100 दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेकडे (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरवली आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात योजनेअंतर्गत 4 हजार 400 पर्यंत मजुरांना रोजगार देणाऱ्या सदर योजनेला आता मजुरच पाठ दाखवत आहेत. 

ग्रामीण क्षेत्रातील मजुरांचे शहरी भागात स्थलांतरण थांबावे व ग्रामीण भागात विविध शासकीय कामे होत राहावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशात ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजना’ राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध प्रकारची कामे राबवून मजुरांच्या हातांना हक्काचे काम देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनरेगाच्या कामांकडे कल अधिक असतो. यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी संपूर्ण टाळेबंदीला लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यापारांसह इतर कामे 24 मार्च पासून बंद होती. त्यामुळे या काळात मजुरांना मनरेगाने भक्कम आधार दिला. परंतु टाळेबंदी शिथिल होताच मजुरांनी मनरेगाकडे पाठ फिरवली आहे. 18 मे रोजी 4 हजार 400 मजुर योजनेच्या कामांवर काम करत होते, परंतु आता मात्र 2 हजार 622 मजुरच काम करत आहेत. त्यामुळे मजुरांनीच योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. 

कामांची संख्या सुद्धा घटली
संपूर्ण टाळेबंदीच्या काळात 18 मे रोजी जिल्ह्यातील 549 ग्रामपंचायतींमध्ये 997 कामे सुरु होती. मात्र त्यानंतर 5 जून रोजी कामांच्या संख्येत कमी झाली. परिणामी आता केवळ 133 काम सुरु आहेत. 

अकोला तालुक्यात सर्वाधिक मजूर उपस्थिती
जिल्ह्यात अकोला तालुक्यात सर्वाधिक 791 मजुर काम करत आहेत. अकोटमध्ये 327, बाळापूर 377, बार्शीटाकळी 172, मूर्तिजापूर 341, पातूर 301, तेल्हारा तालुक्यात 313 मजुर मनरेच्या कामांवर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in lockout mregs scheme gave employment to the workers but after that they refused work