Lumpy : दोन लाख २५ हजार जनावरांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lumpy Vaccination

Lumpy : दोन लाख २५ हजार जनावरांचे लसीकरण

अकोला : लम्पी चर्म रोग हा संसर्गजन्य आजार असून तो ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग आहे. या आजारांच्या नियत्रंणासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. मोहिमेत आतापर्यंत दोन लाख २४ हजार ९३४ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून जर कुणाच्या जनावरांचे लसीकरण बाकी राहिले असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये लम्पी चर्म रोगग्रस्त पशू १८ ऑगस्ट रोजी निपाना या गावामध्ये आढळला होता. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण दोन हजार ९९८ एवढे बाधित जनावरे असून त्यापैकी ७९० जनावरे बरी झालेली आहेत. सद्यास्थितीत लंपी चर्म रोगाचे एकूण दोन हजार १३ सक्रिय रुग्ण आहेत. लंपी रोगाचा प्रादुर्भाव अकोट, तेल्हारा व बाळापूर या तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असून तिथे मर्तुकीचे प्रमाण इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. लंपी चर्म रोगाच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुधनावर योग्य उपचार करून मर्तुकी थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.

रोगाचे क्षेत्रीय निदान होण्यामध्ये अचूकता येण्यासाठी तज्ज्ञ मंडळींच्या सहकार्याने उपचार करणे चालू आहे. उपचारार्थ अकोला पीजीआयव्हीएएस संस्थेमधील पदव्युत्तर, पदवीधारक विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थीची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. गोचिड गोमाशा निर्मुलन कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या मदतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये एकून दोन लाख ८८ हजार २०० लस प्राप्त झाली असून खासगी पदवीधारकाच्या मदतीने लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

जर कुणाच्या जनावरांचे लंपी चर्म रोगाचे लसीकरण बाकी असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आले आहे.