Lumpy virus : लम्पी स्कीन आजाराचा कहर सुरूच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow Lumpy skin disease

Lumpy virus : लम्पी स्कीन आजाराचा कहर सुरूच!

हिवरखेड : भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिप्रधान देशात बैल आणि गाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हिंदू संस्कृतीत गाईला, गोवंशाला देवाचे स्थान आहे, असे असतानाही मुक्या जनावरांना आपली व्यथा मांडता येत नसल्याने जनावरांवरील थोकादायक असलेल्या लम्पी स्कीन आजारावर उपाययोजना प्रभावशून्य ठरल्याने जनावरांचे मृत्यूसत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शेतकरी आणि पशुपालक हवालदिल झाले आहेत.

गत दोन-तीन वर्षात मानवावर आलेल्या कोरोना संकटासारखेच लम्पी नावाच्या रोगाचे जीवघेणे संकट आता मुक्या जनावरांवर आले असून, यात अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अनेक शेतकरी आपल्या बैलजोडीला व गायींना पोटच्या मुलासारखे सांभाळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. पण लम्पी नावाच्या रोगाने शेतकऱ्यांची ही लाडकी जनावरे डोळ्यादेखत मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान, तर होतच आहे शिवाय त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुद्धा हिरावून घेतल्या जात आहे.

आपल्या लाडक्या जनावरांच्या मृत्यूने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून धारा वाहत आहेत. गणपती, दहीहंडी यासारख्या उत्सवात व्यस्त असलेल्यांनी शेतकऱ्यांचीही व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ काढावा, अशी मागणी पशुपालक व शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. लम्पी प्रतिबंधित लस देऊनही रोगाची लागण होत असल्याने शेतकरी व पशुपालक धास्तावले आहेत. अनेक पशुमालकांनी दहा हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करूनही त्यांची जनावरे दगावली आहेत, त्यामुळे पशुमालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

अनेक औषधी उपलब्ध नाहीत

लसीकरणाच्या २१ दिवसानंतर लसीचा पूर्ण प्रभाव सुरू होतो, त्यामुळे नुकतेच २१ दिवसाच्या आत लसीकरण झालेल्या पशुंना लम्पीची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडे औषधसाठेची मागणी केलेली आहे. परंतु, पुरवठा कमी असल्यामुळे जी औषधे आमच्याकडे नाहीत ती शेतकऱ्यांना बाहेरून विकत आणावी लागत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दांदळे यांनी दिली आहे.

अजून आर्थिक मदत मिळालीच नाही

अकोला जिल्ह्यात पाच हजार १०८ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झालेली आहे. त्यापैकी फक्त एक हजार ३९५ जनावरे बरी झाली आहेत, तर तब्बल ३०१ जनावरांचा मृत्यू लम्पीमुळे झाला आहे. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. शासनाने मदतीची घोषणा केल्यावरही लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकाच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

माझ्या दोन गायींना लम्पीची लस दिल्यानंतरही लम्पीची लागण झाली. गायींवर खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेत आहे. आतापर्यंत खुप खर्च झाला आहे. सरकारने लम्पी मुक्तीसाठी युद्धस्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- सुरेश कराळे, पशुमालक, हिवरखेड.

शासनाकडून भरपूर औषधसाठा पुरविला आहे. जी औषधे शासकीय दवाखान्यात उपलब्ध नसतील ती औषधे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः विकत घेऊन त्याची बिले शासनाला सादर करावी. कोणत्याही पशुमालकाला औषधे विकत आणण्याची गरज नाही.

- डॉ गजानन दळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अकोला.