esakal | नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर; ही करावी लागणार कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

Police in akola.jpg

संवेदनशील जिल्हा म्हणून अकोल्याची एक वेगळी ओळख आहे. अशातच कोरोनाचा आलेख वाढता असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणुन जी.श्रीधर यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर; ही करावी लागणार कसरत

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या जागी जी. श्रीधर यांच्याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार हा कोविडच्या काळात आला असून, त्यांच्यापुढे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच वाढते कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या उपाययोजनांची कणखरपणे अमलबजावणी करण्याचे आव्हान आहे.

संवेदनशील जिल्हा म्हणून अकोल्याची एक वेगळी ओळख आहे. अशातच कोरोनाचा आलेख वाढता असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणुन जी.श्रीधर यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तेव्हा नव्याने बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर आव्हाने कायम असून, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोरोना काळामध्ये बंदोबस्तासाठी अकोला पोलिस दलाला डोळ्यात तेल ओतून कर्तव्य पार पाडावे लागणार तर आहेच सोबतच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होणार नाही त्यांचा कसा बचाव होईल याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

या अनुभवी खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, पोलिस निरीक्षक डी.सी. खंडेराव व पोलिस निरीक्षक विलास पाटील, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव, पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे या अधिकाऱ्यांना सद्यपरिस्थितीत जिल्ह्याचा अभ्यास व अनुभव आहे. इतर अधिकारी मात्र नव्याने बदलून आले आहेत. या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी करावा लागणार आहे.

याकडे द्यावे लागणार लक्ष
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पोलिस अधीक्षक जी.श्रीधर हे नव्याने रुजू होणार आहेत. अमोघ गावकर यांच्यानंतर अकोला जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस आयुक्तालयासाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींकडे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावे लागणार आहे. सोबतच अकोला पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे या बाबींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.