वाशीमकरांचा रस्त्यांचा वनवास संपला; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ६० कोटी मंजूर

राम चौधरी
Sunday, 11 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विषेश बाब म्हणून शहरातील रस्त्यांसाठी ६० कोटी रूपये मंजूर केले आहेत.

वाशीम : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रस्त्यांना प्रशासकिय मान्यता मिळूनही रस्त्याची कामे रखडली होती. यासंदर्भात खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विषेश बाब म्हणून शहरातील रस्त्यांसाठी ६० कोटी रूपये मंजूर केले आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली आहेत. या संदर्भात सार्वत्रिक बांधकाम विभागाने ९५ रस्त्यांची निविदाही प्रसिद्ध केली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

वाशीम शहरातील रस्त्यांसाठी खासदार भावनाताई गवळी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ६ मार्च २०१९ लाच ६० कोटी रूपये मंजूर करून घेतले होते. यानंतर नगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेतली होती. या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकिय मान्यता देखील दिली होती. मात्र, नगरपालिका प्रशासनात कोठे माशी शिंकली अन् पालिकेने या कामांच्या निविदाच काढल्या नाही. पर्यायाने यातील २७ कोटी रूपये मार्च २०२० ला परत गेले. शासनाने १८ जुलै २०१९ ला आणखी दहा कोटींची कामे मंजूर केली होती. याच्याही निविदा काढल्या नाहीत. 

हे ही वाचा : मंगळवारपासून ‘आशां’चे काम बंद आंदोलन

शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था व नागरिकांना होत असलेला त्रास पाहून खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. मुख्यमंत्र्यांनी या बाबीला तत्काळ होकार दिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत त्वरित कारवाईचे आदेश करत ही ६० कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली आहेत.

या रस्त्यांचे उजळणार भाग्य

या मंजूर कामामध्ये अकोलानाका ते पाटणीचौक रस्ता (४.५ कोटी), अकोला नाका ते राजस्थान काॅलेज (तीन कोटी), काळे फैल ते देशमुख काॅम्लेक्स (दोन कोटी ७५ लाख), पुसद नाका ते मन्नासिंह चौक (दोन कोटी २० लाख), म्हाडा काॅलनीतील अंतर्गत रस्ते (१.५ कोटी), मन्नासिंह चौक ते परळकर चौक ते कालेश्र्वर मंदीर (७० लाख), पोष्ट ऑफिसचे चौक ते गजानन महाराज चौक ते लोनसुने चौक (चार कोटी), कोंडाळा चौक ते सुंदर वाटीका (२.५० कोटी), खोडे माऊली नगर ते गवाणकर नगर (१.२५ कोटी), राजेंद्रप्रसाद शाळा ते जुनी आयुडिपी (१.२५ कोटी), जुनी नगरपालिका ते सुभाषचौक (१ कोटी) या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांमध्ये वाशीम शहरातील सर्व मुख्य मार्गाचे काॅक्रीटीकरण होणार असून, पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते कात टाकणार आहेत. या रस्त्यांची निविदा प्रसिद्ध झाल्याने शहरातील सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

अकोला नाका रस्ता लागला मार्गी

शहरात अकोला नाका ते पाटणीचौक हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावर चालणेही कठीण झाले होते. आता हा महत्त्वाचा रस्ता पूर्ण होणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Bhavnatai Gawli has approached the government for roads in Washim city