esakal | होती पावसाची वाट, वाहले घामाचे पाट...या जिल्ह्यात मृग नक्षत्राची सुरुवात कोरडीच
sakal

बोलून बातमी शोधा

weather.jpg

ग्रामीण भागात अजूनही पावसाळा म्हटले की, त्यामध्ये नक्षत्राचे सर्वाधिक महत्त्व राहाते. त्यातही नक्षत्राच्या वाहनाबाबत विचार केला जातो आणि पंचांगानुसार त्या वाहनावर आधारित पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याची प्रक्रिया सांगण्यात येते. त्यामुळे शेती कामे व पेरणीसाठी नक्षत्र आणि त्याच्या वाहनाचा विचार केला जातो. यंदाही मृगाच्या प्रवेशापूर्वी वातावरणात बदल दिसून येत होते व हवामान विभागानेही स्थानिक हवामान बदलानुसार पावसाच्या सरी कोसळण्याचे संकेत दिले होते. परंतु, अकोल्यात मृगाचा पहिलाच दिवस कोरडा गेला. दिवसभर गर्मी अधिक राहून तापमानाचा जोरही अधिक होता.

होती पावसाची वाट, वाहले घामाचे पाट...या जिल्ह्यात मृग नक्षत्राची सुरुवात कोरडीच

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : मृग नक्षत्रापासून मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होते अन् यावर्षी तर मॉन्सूनची सुरुवात जोरदार होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते. परंतु, अकोल्यात मृगाची सुरुवात कोरडीच झाली. ढग दाटले पण सरी कोसळ्याच नाहीत. उलट दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता अन् पावसाऐवजी घामाच्या धारांनीच अकोलेकरांना चिंब करून सोडले.

ग्रामीण भागात अजूनही पावसाळा म्हटले की, त्यामध्ये नक्षत्राचे सर्वाधिक महत्त्व राहाते. त्यातही नक्षत्राच्या वाहनाबाबत विचार केला जातो आणि पंचांगानुसार त्या वाहनावर आधारित पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याची प्रक्रिया सांगण्यात येते. त्यामुळे शेती कामे व पेरणीसाठी नक्षत्र आणि त्याच्या वाहनाचा विचार केला जातो. यंदाही मृगाच्या प्रवेशापूर्वी वातावरणात बदल दिसून येत होते व हवामान विभागानेही स्थानिक हवामान बदलानुसार पावसाच्या सरी कोसळण्याचे संकेत दिले होते. परंतु, अकोल्यात मृगाचा पहिलाच दिवस कोरडा गेला. दिवसभर गर्मी अधिक राहून तापमानाचा जोरही अधिक होता. शिवाय पुढील दिवसात आर्द्रतेचा टक्का वाढण्यासोबतच कमाल तापमानही वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले असून, दमदार पावसासाठी अजूनही अकोलेकरांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागू शकते.

हे ही वाचा : भाववाढीचा भार अन् वजनातही मार...महाबीजची सोयाबीन बॅग किमतीने महाग वजनाने हलकी

पेरणीसाठी धीर धरावा
जोपर्यंत 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडून जमिनीत ओलावा निर्माण होणार नाही तसेच भरपूर पाऊस पडून दोन ते तीन फूट खोल जमीन भिजेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

हे ही वाचा : राज्यशासनाचा ‘हिरवा’ कंदील...आरबीआयचा मात्र दिवा ‘लाल’

पारा वाढणार
मेळघाट, अमरावती-वर्धा जिल्ह्यातील सीमा परिसरात, वाशिम-यवतमाळ जिल्हा सीमा क्षेत्र, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासोबत कॉमन विभागात स्थानिक स्वरूपात, तुरळक पावसाची शक्यता असून, इतर ठिकाणी स्थानिक, अनियमित स्वरूपात पावसाची उपस्थिती राहु शकते. अकोला जिल्हा व लगतच्या परिसरात पावसाच्या गैरहजेरीत, तापमानात वाढ झालेली दिसून येत असून, पारा पुन्हा 40 अंशाकडे जाण्याची शक्यता आहे. वऱ्हाडात मॉन्सूनच्या आगमनाला अजून पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर