मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाणे ठरले जिल्ह्यात अव्वल; मूल्यांकन पद्धतीत केली उत्कृष्ट कामगिरी

प्रा.अविनाश बेलाडकर
Sunday, 11 October 2020

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी व लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यात ‘मूल्यांकन पद्धत’ सुरू झाली आहे.

मूर्तिजापूर (अकोला) :  जिल्ह्याअंतर्गत मूल्यांकनानुसार येथील ग्रामीण पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्यरितीने पार पाडल्यामुळे सदर यश मिळाल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी व लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यात ‘मूल्यांकन पद्धत’ सुरू झाली आहे. येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार रहीम शेख यांनी आपली यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लावली. उपनिरीक्षक स्वाती इथापे, रत्नपारखी व इतरांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेतले. गुन्हे, नियंत्रण, गुन्हे प्रगटीकरण, कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी, कोरोना काळातील जनजागृती, कम्युनिटी पोलिसिंगचा योग्य वापर करून घेणे, सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा प्रभावी वापर करून गुन्हे शोध व प्रतिबंधक कारवाईद्वारे गुन्हेगारी नियंत्रित करणे अशी ठसठशीत कामे केली. सप्टेंबर महिन्याचा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या कामाचा ‘नवीन मूल्यांकन पद्धती’नुसार आढावा घेण्यात आला. त्यात आपल्या कार्य पद्धतीच्या जोरावर येथील ग्रामीण पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले.

जी.श्रीधर साहेबांच्या निर्देशानुसार कामाला लागलो. ठाण्यातील सर्व स्टाफच्या समन्वयक सहभागातून नियोजनपूर्वक काम केले. झालेल्या कामांचा दररोज आढावा घेतला व पुढील कामाचे नियोजन करून निरपेक्षपणे काम करीत राहिलो. त्यामुळेच सदर पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले.
- रहीम शेख, ठाणेदार, ग्रामीण पोलिस ठाणे, मूर्तिजापूर

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murtijapur Rural Police Thane is leading in Akola district