ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

अकोला : नुकत्याच फेरबदल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका मांडली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही नामंजूर केले. (NCP Akola MLA Amol Mitkari bjp Pankaja Munde Tweet)

धर्मयुद्ध टाळण्याचा शक्यतोवर प्रयत्न करीत असल्याचा सूचक इशारा देत पंकजा मुंडे यांनी माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.

पदाची आणि खुर्चीची लालसा नाही

‘मी निवडणूक हरले, पण संपले नाही, म्हणून तर संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. मी कोणाकडेही कधीही पद मागितले नाही. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना त्यावेळी संघर्ष यात्रेत जनतेकडून व्यक्त झाली होती. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला वंचितांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणले. मला किंवा माझ्या बहिणीला मंत्री करा, यासाठी आम्हाला राजकारणात आणलेले नाही. हे आमच्यावर संस्कार नाहीत.’

भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत त्या म्हणाल्या की, ‘मी माझ्या समाजाच्या मंत्र्याला अपमानित का करू? पक्ष हे आपल्या कष्टाने तयार केलेले घर आहे, ते मी का सोडू?’ असा सवालही मुंडे यांनी केला.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

NCP Akola MLA Amol Mitkari bjp Pankaja Munde Tweet