केंद्राने पाठवले अन् राज्य सरकारने अडवले...., भाजप आमदारांचा राज्य सरकारवर आरोप

मनोज भिवगडे
Friday, 31 July 2020

केंद्र शासनाने राज्याला वेळेत आवश्यक तेवढा युरीयाचा खत पुरवठा केला आहे. त्यामुळे राज्यात मुबलक खत असतानाही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे.

अकोला  : केंद्र शासनाने राज्याला वेळेत आवश्यक तेवढा युरीयाचा खत पुरवठा केला आहे. त्यामुळे राज्यात मुबलक खत असतानाही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेळे पूर्वीच युरीया खताचा साठा मुबलक प्रमाणात महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्याकडून पुरवठा करून घेतला. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता केंद्राकडून घेण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोला जिल्ह्याला मागणीनुसार कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार युरिया उपलब्ध करून दिला. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बोलले होते. परंतु काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सरकार योग्य नियोजन करत नसल्यामुळे शेतकऱ्यांना युरीयासाठी दुकानावर रांगा लावाव्या लागत असल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला आहे.

एकीकडे कोविड-१९ या कोरोना विषाणूमुळे नागरिक धास्तावले असताना शेतकऱ्यांना खतासाठी रांगा लावाव्या लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग ग्रामीम भागात शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची भीती असल्याचेही आमदार म्हणाले.

त्यामुळे सरकारने दोन दिवसांत नियोजन केले नाही तर शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे.
 
या कंपन्यांचा राज्याला युरीया पुरवठा
राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत युरीया मिळावा म्हणून केंद्र सरकारने नियोजन करून राज्याला काही कंपन्यांकडून युरीया मिळवून दिल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार क्रिभको युरीया १२०० मेट्रिक टन ता. २७ जुलै २०२० रोजी प्राप्त झाला आहे. झुआरी कंपनीकडून ११७५.८५ मेट्रिक टन खत प्राप्त झाले असून, गुजरात स्टेट फटिलाझरकडून ८०० मेट्रिक टन खत राज्यात येणार असल्याचे सावरकर यांनी सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstruction from the state government for the fertilizer sent by Akola Marathi News Center BJP MLAs accuse state government, claiming abundant reserves in the state