अरे हे काय...ठोक बाजारातच एवढी गर्दी, कोरोना रोखणार कसा? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

अनलॉक-१ मध्ये या दोन्ही बाजारात होत असलेली गर्दी व किरकोळ भाजी खरेदीदारही या बाजाराकडे वळल्याने आता बाजारातूनच समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला ठोक बाजार हिंगणा रोडवर स्थलांतरीत करण्यात आला. भाजी व फळ बाजार वेगवेगळे करण्यात आले. यामागे गर्दी कमी करून नागरिकांना कोरोनाच्या समूह संसर्गापासून दूर ठेवणे हा होता. मात्र अनलॉक-१ मध्ये या दोन्ही बाजारात होत असलेली गर्दी व किरकोळ भाजी खरेदीदारही या बाजाराकडे वळल्याने आता बाजारातूनच समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

 

अकोला जिल्ह्यातील ठोक बाजारातील लिलाव हे कोरोनापूर्वी जनता भाजी बाजारात होत असे. कोरोनामुळे येथे संसर्गाचा धोका अधिक असल्याने जनता भाजी बाजारच बंद करण्यात आला. ठोक विक्रीसह येथील किरकोळ विक्रेत्यांनाही स्थलांतरीत करण्यात आले. ठोक बाजार हिंगणा रोडवर स्थलांतरीत करण्यात आला. येथे किरकोळ भाजी विक्रेते दररोज लिलावातून भाजी व फळे विकत घेतात. मात्र आता घरच्यासाठी लागणार भाजीपाला खरेदीही येथून सुरू झाली आहे. त्यामुळे ठोक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते व ग्राहकांची या बाजार होत असलेली गर्दी कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका वाढवणारी ठरत आहे.

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जागेचा प्रश्‍न
भाजी व फळ बाजारात होत असलेल्या गर्दीच्या तुलनेत येथे असलेली जागा कमी पडत आहे. अद्यापही येथील दुकानांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कमी जागेतच गर्दी होत असलल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे जळपास अशक्य झाले आहे.

 

प्रशासनही हतबल
मनपा प्रशानाने व्यावसायिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या धोक्याबाबत वारंवार सूचना दिली आहे. प्रसंगी बळजबरीने व्यवसायही बंद करण्याचा इशारा दिला आहे. कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. मात्र आता बाजारात होत असलेल्या गर्दीमुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

 

...तर पुन्हा लॉकडाउनची वेळ येईल
शासन व प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून नागरिकांच्या सोयीसाठी काही व्यवहार हळूहळू सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या सुविधेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असेल आणि नागरिकच त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर पुन्हा लॉकडाउनची वेळ येईल. ती येणार नाही याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे, असा इशारा मनपा प्रशासनातर्फे देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh what is this ... such a crowd in the wholesale market, how to stop Corona?