esakal | पोटा गावात एकाच दिवशी ७७ रुग्ण पॉझिटिव्ह.गाव कॅटेंटमेंट म्हणून घोषित

बोलून बातमी शोधा

पोटा गावात एकाच दिवशी ७७ रुग्ण पॉझिटिव्ह
पोटा गावात एकाच दिवशी ७७ रुग्ण पॉझिटिव्ह
sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील पोटा येथे (ता.१२) रोजी एकाच दिवशी ७७ रुग्ण रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने हे गाव कोरोनासाठी हॉटस्पॉट बनले असून आतापर्यंत ३ वेळेस केलेल्या एकूण २२२ चाचण्यामधून तब्बल ९५ रुग्ण पॉझिटीव्ह आले असतांना इतर बाहेर केलेल्या टेस्टमधून इतरही असे सर्व मिळून १०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या गावात एवढे रुग्ण पॉझिटिव्ह आले असतांना आरोग्य विभाग मात्र गाढ झोपेत असून सदर गावाला भेट दिली असता सर्व मोठे अधिकारी आपआपल्या गावी गुढी पाडवा साजरा करत असून सध्या गावात स्मशान शांतता असून सर्व गल्ली बोळा ओस पडल्याचे दिसून आले आहे.

या गावाला भेट दिली असता मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्करच्या माध्यमातून फक्त गावातील लोकांचे ऑक्सिजन लेव्हल तपासण्याचे काम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पहावयास मिळाले आहे.

नांदुरा तालुक्यातील ७५० लोकवस्तीचे तरवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये पोटा हे लहानसे गाव.या गावात नेमकी कोरोनाचे संक्रमण कसे झाले हे अज्ञात असून येथील लोकांच्या मतानुसार सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू असून सर्व गावकऱ्यांचे इतर गावात येणे जाणे सुरू असल्याने कुठून तरी ही साखळी जोडल्या गेल्याची कुजबुज ऐकू आली.या गावात सर्वप्रथम आठ दिवसांपूर्वी सर्दी व खोकला जाणवल्याने २४ लोकांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले असता त्यात एक कोरोना रुग्ण सापडला होता.नंतर गावात कॅम्प आयोजित करून ५४ लोकांचे रॅपिड नमुने घेतले होते

त्यात १६ व दि.१२ एप्रिल रोजी पुन्हा कॅम्प आयोजित करून १४४ रॅपिड टेस्ट मधून ७७ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आतापर्यंत या गावात २२२ रुग्णांची कोरोनासाठी रॅपिड टेस्ट केली गेली असता तब्बल ९४ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोबतच इतर काही गावकऱ्यांनी स्वतःच्या मर्जीनुसार इतरत्र कोरोना टेस्ट करून घेतली असता या गावात सध्या जवळपास १०५ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोन लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्या संपूर्ण गाव सील करण्यात आले असून गाव सील होण्या अगोदरच अनेकांनी स्वतःच्या शेतात जाण्यावर भर दिला असल्याचेही दिसून आले आहे.पोटा या छोट्याशा गावात कोरोना सदृश्य लक्षणे अनेकांत दिसून येत असल्यामुळे मी स्वतः आरोग्य विभागाला सुरक्षेच्या दृष्टीने कॅम्प आयोजित करण्याची विनंती केली असता रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह दिसून आले.सध्या गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण हे जरी असिमटोमॅटिक प्रकारातील असले तरी आरोग्य विभागाचे पाहिजे तसे सहकार्य मुळीच आजही नाही. या विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला फोन लावला तर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तेवढे काय ते येऊन थोडाफार औषध साठा देऊन पसार होतात. आज गुढीपाडवा असल्याने दिवसभरात आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी साधा विचारपूस करण्यासही येऊ शकला नाही.ही खरी खंत आहे.

- रामकृष्णा पाटील,सामाजिक कार्यकर्ता,पोटा.