राज्यभरात कीड नियंत्रण ‘अनियंत्रित’; दरवर्षी निम्मे पीक होते उद्‍ध्वस्त 

Pest.jpg
Pest.jpg

अकोला : राज्यभरात दरवर्षी कीडीचे साम्राज्य वाढत असून, जवळपास निम्मे शेतीचे उत्पन्न कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने उद्‍ध्वस्त होत आहे. या समस्येवर उपाययोजनेसाठी कोट्यवधी खर्चून कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. परंतु, अजूनपर्यंत अकोला जिल्ह्यात तसेच राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पिकांवरील किडी, रोगांवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे दिसत नसून, कीडनियंत्रण विभाग आणि अधिकाऱ्यांच्या कामावर शेतकऱ्यांकडून प्रश्‍नचिन्ह लावण्यात येत आहे.



शेती उत्पन्न घटण्यासाठी कीडी, रोग मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शेती व शेतकरी विकासाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी समस्या असून, ती सोडविण्यासाठी शासनाने कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व इतर यंत्रणांमध्ये कीड व रोग निंयत्रण विभाग तयार करून त्यामध्ये नियुक्त अधिकारी, शास्त्रज्ञांवर कोट्यवधीचा खर्च होत असतो. मात्र कित्येक वर्षांपासून पिकांवर दरवेळी येणारी कीड व रोग या यंत्रणेने ठोस व कमी खर्चाची उपयायोजना करून नियंत्रित केलेले नाहीत किंवा त्यासाठीचे संशोधन केलेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी पीकांवर कीडी, रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून, त्यांना नियंत्रीत करण्यासाठी कीटकनाशकांवर कोट्यवधीचा खर्च राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात निर्मीत कीडनियंत्रण यंत्रणा नेमके काय करते व शासनाचा पर्यायाने जनतेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोणत्या संशोधनावर करते, याविषयी शेतकरी संघटना तसेच शेतकरी प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

जनजागृतीचा अभाव
पिकांवरील कीडी व रोगांचे नियंत्रण कसे करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी शासनाच्या कृषी अखत्यारीत ख्यात्यामध्ये कार्यरत आहेत. परंतु, योग्यवेळी व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हे अधिकारी कर्मचारी पोहचत नाहीत किंवा त्यांचेकडून वेळेत माहिती दिली जात नाही व कीड व रोगांचे आक्रमण झाल्यानंतर आणि तशी तक्रार नोंदविल्यानंतर खर्चीक उपाययोजना सूचवण्याचे कार्य केल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत.

आमदारांनी केली मागणी
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कीड व रोग नियंत्रणासाठी अधिकारी, शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, संबंधित जबाबदार अधिकारी त्यांचेकडे विविध प्रभार असल्याची सबब नेहमी पुढे करतात. तेव्हा शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी कीड व रोग नियंत्रणासाठी विद्यापीठात व जिल्ह्यात स्वतंत्र विभाग, अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी (ता.२९) कृषिमंत्री दादा भुसे यांना अकोल्यात आयोजित कृषी आढावा बैठकीत केले.

संशोधन दाखवा!
कीड व रोग नियंत्रासाठी कीडी व रोगांना प्रतिकार करणाऱ्या पीक वाणांचे संशोधन होणे गरजेचे आहे तसेच कीडी व रोगांवर कायमस्वरुपी नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस व कमी खर्चाचे उपाययोजन, व्यवस्थापन शस्त्रज्ञांनी देणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी केलेले ठोस संशोधन दाखवावे व त्याचे परिणाम सिद्ध करून दाखवावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

नवनवीन कीड, रोग येतात कसे?
पिकांवर हल्ली नवीन कीडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, या प्रादुर्भावामुळे अख्खे पीक उद्‍ध्वस्थ होत आहे. त्यामुळे या नवनवीन कीड व रोग कसे व का येत आहेत, याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com