esakal | योद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा!

बोलून बातमी शोधा

योद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा!
योद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • प्लाझमा दान जीवन दान

  • अंधारात दातृत्वाच्या पणतीची आशा

वाशीम ः गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात पंचवीस हजाराच्यावर कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर जोरात आहे. अनेकांचे श्वास कोंडले आहेत. अनेकजण जीवनरक्षक प्रणालीवर श्वास घेत आहेत. या परिस्थीतीत कोरोनाची लागण झाल्यानंतर ठणठणीत झालेल्या नागरिकांच्या रक्तातील प्लाझमा अनेकांचे जीव वाचवू शकते. या कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांनी आता उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लाझमा थेरपी हा शेवटचा उपाय नसला, तरी अ‍ॅन्टीबॉडी कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. याबाबत सामाजिक संस्थानी पुढाकार घेवून जनजागृती करण्याची गरज आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २६ हजाराच्यावर रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी २२ हजार ४४६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. फक्त २८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यामध्ये पावणे चार हजार रुग्ण कोरोनाशी झुंजत आहेत. जिल्ह्यामध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा असला, तरी रेमडिसिव्हिरची उपलब्धता कमी आहे. या परिस्थीतीत प्लाझमा थेरपी काही प्रमाणात रुग्णांना दिलासा देवू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती तो रुग्ण ठणठणीत बरा झाल्यानंतर तो प्लाझमा दान करू शकतो. रक्तदान केल्यासारखाच हा प्रकार असून, या दानाने अनेकांचे जीव वाचू शकतात. सामाजिक संघटना व संस्थांना पुढाकार घेवून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

रुग्णाला कोविड झाल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये कोविडशी लढण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात. या अ‍ॅन्टीबॉडीज दहा ते तीस दिवसांपर्यंत शरीरात तयार होतात. यालाच आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. या अ‍ॅन्टीबॉडीज सहा महिन्यापर्यंत शरीरात राहतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरिरातून रक्त घेतात, त्या रक्तातून प्लाझमा वेगळा केला जातो. हा प्लाझमा संबंधित रक्तगटाच्या बाधित रुग्णाला दिला जातो. ज्या रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होत नाही. त्याच्यासाठी प्लाझमा थेरपी हा एक उपचाराचा भाग आहे.

-डॉ. सचिन पवार, वाशीम.

जो व्यक्ती रक्तदान करू शकतो तो व्यक्ती प्लाझमा दाता ठरतो. रुग्णाच्या शरीरात उपचाराच्या आठवडाभरानंतर प्रतिकारशक्ती तयार होवू शकते. ही प्रतिकारशक्ती सम रक्तगटाच्या व्यक्तीला देणे म्हणजेच प्लाझमा थेरपी आहे. याबाबत अजून प्रयोग चालू आहेत. प्लाझमामुळे शंभर टक्के रुग्ण बरा होवू शकतो. याबाबत अजून संशोधन सुरू आहे, मात्र उपचारामध्ये ही थेरपी वापरायला काही हरकत नाही.

-डॉ. सिद्धार्थ देवळे, वाशीम.

मोरया ब्लड डोनर ग्रुपचा पुढाकार

प्लाझमा थेरपी अंतर्गत कोरोना बाधित रुग्णाला उपचारात मदत होत असल्याने वाशीम येथील मोरया ब्लड डोनर ग्रुपने प्लाझमा दानाबाबत जनजागृती सुरू केली आहे. सेवार्थ असलेल्या या ग्रुपने आठ दिवसात आवाहन केल्याने तब्बल पंधरा जणांनी प्लाझमा दान केला आहे. इतरही सामाजिक संघटनांनी याबाबत जनजागृतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

संपादन - विवेक मेतकर