
प्रभातमध्ये रंगला ‘आठवणीतील शांताबाई’; राजभाषा मराठी दिनाचे औचित्य
अकोला : मराठी साहित्यातील अवीट गोडी मराठी कविता अन् गीतांमध्ये सामावली आहे आणि त्यातही कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीतांमध्ये जीवनाचे सर्वच रंग उधळले आहेत. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला व प्रभात किड्स यांच्या संयुक्तपणे शनिवारी (ता.२६) ‘आठवणीतील शांताबाई’ हा कार्यक्रम सादर झाला.
शांताबाई शेळके रचित सूमधूर गीतांच्या सादरीकरणाने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला. राजभाषा मराठी दिनाच्या पूर्व दिनी प्रभात किड्स स्कूलच्या भव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात शांताबाई शेळके यांची गीते सादर झालीत. बालगायिका परिणीता बारापात्रे, सनी इंगळे, स्वाती ठाकरे, नंदकिशोर डंबाळे, आनंद जोशी, रश्मी देव, संजीवनी अठराळे, आशिष खुरपे, विजय वाहोकार, आनंद पद्मन यांनी विविध गीतं सादर केली. आदित्य वाघमारे (सिंथेसायझर), अतुल डोेंगरे (सिंथेसायझर), मनोज रुद्रकार (ऑक्टोपॅड), अमित जोशी (तबला), विजय वाहोकार (हार्मोेनियम), नंदकिशोर डंबाळे (ढोलकी) यांनी विविध वाद्यांवर साथसंगत देऊन संगीतमय कार्यक्रमात एकच रंगत आणली.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षास १४ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, विदर्भ साहित्य संघाद्वारे वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे मनोगत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या प्रास्तविकातून व्यक्त केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी प्रा. डॉ. निशा बाहेकर, डॉ. गजानन मालोकार, निरज आंवडेकर, डॉ. विनय दांदळे, विजय देशमुख, दिलीप इंगोले, सुरेश पाचकवडे, प्रा. डॉ. सुहास उगले, डॉ. रामेश्वर पुरी, एसडीओ बाळापूर, प्रा. निलेश पाकदुने, किशोर बळी व प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे, प्रभातच्या संचालिका वंदना नारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत कार्यकारिणी सदस्य नरेंद्र लांजेवार व साहित्य प्रेमी विलास शेटे यांना श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन स्निग्धा देशमुख व अनुराधा माहोरे यांनी केले तर, आभार डॉ. विनय दांदळे यांनी मानले.
Web Title: Poet Shanta Shelke Memories Rajbhasha Marathi Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..