esakal | HIV संक्रमण प्रकरण : प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे, FDAच्या केंद्रीय पथकाकडून रक्तपेढीचीही चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

HIV

HIV संक्रमण प्रकरण : प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या शरिरातील पांढऱ्या पेशी कमी असताना तिला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या प्लेट्सलेट देण्यात आल्या. त्यामुळे चिमुकलीला सुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची (HIV infection from blood bank) बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वंदना वसू यांनी प्राथमिक चौकशी केली असून त्यासंबंधिचा प्राथमिक अहवाल गुरूवारी (ता. २) शासनाकडे सादर केला आहे. सदर प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सुद्धा त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. दुसरीकडे अन्न व औषधी प्रशासनाचे एक केंद्रीय अधिकारी (FDA central team) जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी सुद्धा वेगळ्याने ब्लड बॅंकेची चौकशी सुरू केली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: धक्कादायक! रक्तपेढीतील रक्तातून चिमुकलीला HIV ची बाधा

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील रहिवासी महिलेने १९ ऑक्टोबर २०२० रोजी एका चिमुकलीला जन्म दिला होता. जन्मनंतर चिमुकलीची तब्बेत ठिक राहत नसल्याने तिच्या घरच्यांनी चिमुकलीवर मूर्तिजापूर येथील अवघते रुग्णालयात उपचार केले होते. उपचारादरम्यान चिमुकलीच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे तिला पांढऱ्या पेशी देण्यासाठी अकोला येथील बी.पी. ठाकरे रक्तपेठीतून प्लेट्‍सलेट मागविण्यात आल्या होत्या. सदर प्लेट्‍सलेट एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या असल्यामुळेच चिमुकलीला सुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वंदना वसू यांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून त्याचा अहवाल शासनाला गुरुवारी (ता. २) पाठवला आहे. असे असले तरी या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

अन्न व औषधी प्रशासनाचे केंद्रीय पथक दाखल -

प्लेट्‍सलेटमधून चिमुकलीला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची बाब समोर येताच ब्लड बॅंकेची व प्रकरणाशी संबंधित इतर बाबींची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक चंद्रशेखर गुरुवारी (ता. २) सकाळी अकोल्यात दाखल झाले. त्यांनी स्वतंत्ररित्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये ब्लड बॅंकेच्या रेकॉर्डसह इतर बाबींची तपासणी करण्यात येत आहे.

असा आहे घटनाक्रम -

सतत तब्बेत ठिक राहत नसल्याने २३ ऑक्टोबर २०२० रोजी चिमुकलीला मूर्तिजापूर येथील अवघते हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. यावेळी २४ व २६ ऑक्टोबर रोजी प्लेट्‍सलेट दिल्या होत्या. त्यानंतर सुद्धा तिची प्रकृती खराब राहत असल्याने तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावर १४ जुलै २०२१ रोजी चिमुकलीची एचआयव्ही तपासणी केली. तपासणीचे नमुने पुणे येथील ‘नीरी’च्या कार्यालयात पाठवण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल ४ ऑगस्ट २०२१ रोजी पॉझिटिव्ह आला. चिमुकलीच्या आई व वडिलांची सुद्धा एचआयव्ही तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. शेवटी चिमुकलीच्या संसर्गाचा छडा लावण्यासाठी तिची मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली. त्यामध्ये तिला ऑक्टोबर २०२० मध्ये प्लेट्‍सलेट देणाऱ्या दोन रक्तदात्यांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या प्लेट्‍सलेट चिमुकलीला २६ ऑक्टोबर रोजी देण्यात आल्या होत्या.

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. असे असले तरी सखोल चौकशी सुरू आहे. दुसरीकडे अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी सुद्धा चौकशी करत आहेत.
- डॉ. वंदना वसू, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
loading image
go to top