esakal | तत्काळ पंचनामे करा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
sakal

बोलून बातमी शोधा

Rains in various parts of Buldana district have caused severe damage to crops

जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट 19 व 20 मार्चला झाली. यामध्ये प्रामुख्याने गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे.

तत्काळ पंचनामे करा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट 19 व 20 मार्चला झाली. यामध्ये प्रामुख्याने गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहे. 

गारपीटग्रस्त भागाचा सर्व्हे करा : आमदार संजय गायकवाड 

बुलडाणा तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपीट झाली. या गारपिटीत गिरडा, इजलापूर, मढ, पाडळी व चौथा गावालगत शेकडो हेक्टर शेतीवरील कांदा, गहू, फळबाग व वैरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतीचे तात्काळ सर्व्हे करून मदतीकरिता शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी तहसीलदार यांना दिले आहे. अवकाळी पावसामुळे बुलडाणा तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीमध्ये नुकसान झाले आहे. वादळी वारा, पाऊस व गारपीटमुळे शेतात उभा असलेला गहू, कांदा व फळबाग सोबत जनावराचे वैरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ. संजय गायकवाड यांनी आज नुकसान झालेल्या शेती व शेतकर्‍यांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी तहसीलदार यांना तात्काळ निर्देश देऊन या परिसरातील नुकसानीचा सर्व्हे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे सांगितले. शासन दरबारी प्रस्ताव गेल्यानंतर शासनाकडून भरीव मदत मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचा दिला. यावेळी आ. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्‍यांना दिला. 

पीक पंचनामे करून मदत द्या : माजी आमदार डॉ. खेडेकर 

देऊळगावराजा तालुक्यात झालेल्या गारपीट वादळी वारा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. वादळी वाऱ्‍यासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील काही गावात जाऊन डॉ. खेडेकर यांच्या समवेत तालुका प्रमुख दादाराव खार्डे, ज्येष्ठ नेते धनशिराम शिंपणे, पंचायत समिती सदस्य भगवान खंदारे, गजानन घुगे यांनी दगडवाडी, किन्ही पवार, मेव्हणा राजा परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदनाद्वारे तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सदर निवेदनावर माजी आमदार शशिकांत खेडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. रामप्रसाद शेळके, उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, जिल्हा परिषद सदस्य शीला शिंपणे यांच्या स्वाक्षरी आहे. 

नुकसानाचा तत्काळ सर्व्हे करा :आमदार डॉ. संजय रायमूलकर 

मेहकर व लोणार तालुक्यातील नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करा असे निर्देश शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी प्रशासनाला दिले आहे. दोन दिवसांपासून मेहकर व लोणार तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पीक, फळबाग, शेडनेट आदींचे नुकसान झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पाहणी करण्याची इच्छा असूनही करता येणार नाही ही अडचण मतदारसंघातील शेतकऱ्‍यांनी समजून घ्यावी असे आमदार संजय रायमूलकर यांनी कळवले आहे. तर ज्यांना काही अडचण असेल त्यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रतिनिधी विलास आखाडे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image