गावाची दमदार मजल ! बच्चू कडूंनी गाव दत्तक घेतले मग काय गाव थेट 'या' क्षेत्रात स्वयंपूर्ण

प्रा.अविनाश बेलाडकर 
Monday, 31 August 2020

पालकमंत्री बच्चू कडू यांनी राजनापूर गावाला पालकमंत्री झाल्यावर पहिली भेट दिली होती. यावेळी गावातील पंतप्रधान व रमाई आवास योजनेच्या माध्यमातून अपंग बांधवांचा त्यांच्यामार्फत गृह प्रवेश करून दिला होता. त्याच दिवशी त्यांनी हे गाव दत्तक घेतले. सर्व अधिकाऱ्यांना या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : तालुक्यातील राजनापूर गावात विकासकामांची गंगा अवतरली असून, सौरउर्जापूर्ण होणारे ते जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी राजनापूर गावाला पालकमंत्री झाल्यावर पहिली भेट दिली होती. यावेळी गावातील पंतप्रधान व रमाई आवास योजनेच्या माध्यमातून अपंग बांधवांचा त्यांच्यामार्फत गृह प्रवेश करून दिला होता. त्याच दिवशी त्यांनी हे गाव दत्तक घेतले. सर्व अधिकाऱ्यांना या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्या छत्तीस लाख रुपयाच्या सौर ऊर्जेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे आता राजनापूर ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी व पाणीपुरवठा संपूर्ण सौरऊर्जेवर चालवणारे अकोला जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत व पहिलेच गाव ठरणार आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे येत्या २५ वर्षांची वीज बचत होणार असून, २४ तास अखंडितपणे वीज असल्यामुळे ग्रामपंचायतीची कामे व जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या लाभ होणार आहे.

सौर ऊर्जेचे सोलर पंप बसवल्यामुळे संपूर्ण गावाला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध होईल. ग्रामपंचायत अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर सौर पॅनल, अंगणवाडीसाठी सौर कुकर, खिचडी शिजवण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर पाच एचपीचे सौर पॅनल, गावातील चौकात ४० फुटाचे हाय मास टॉवर, सौर उर्जेवर चालणारे सौर पथ दिवे, अशी कामे होत आहेत. बच्चू कडू यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी महाऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकल्प त्वरित करण्याचे आदेश दिले होते.

पालकमंत्र्यांनी गाव दत्तक घेतल्यानंतर गावांमध्ये छत्तीस लाख रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प काही दिवसातच कार्यान्वित होणार आहे. इतरही स्मशानभूमी सौंदर्यीकरण, राजेश्वर मंदिर सभागृह, दलितवस्ती सभागृह, रस्ते व्यायामशाळा, अभ्यासिका, अंबामाता तलाव खोलीकरण अशी विविध विकास कामे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने होणार आहेत.
-प्रगती रुपेश कडू. सरपंच, राजनापूर.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnapur is becoming the first solar powered village in Akola district