अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र; प्रदेशस्तरावर खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party

अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र; प्रदेशस्तरावर खळबळ

अकोला : जिल्हा काँग्रेसमध्ये नवीन नियुक्तीनंतर सुरू झालेल्या राजीनाम सत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांतच ज्येष्ठ नेत्यांसह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाध्यक्षांवर मनमानीचा आरोप लावत राजीनामे दिल्याने प्रदेश काँग्रेसलाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यासाठी निवडक पदाधिकाऱ्यांची मुंबईत मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये केलेले बदल अनेकांच्या पचणी पडले नाही. जिल्ह्यातील नेतृत्वामध्ये बदल केल्याने संघटनेत नव्यानेच दाखल झालेल्यांच्या हातात कारभार गेल्याची नाराजी नियुक्तीपासूनच होती. मात्र, प्रदेश काँग्रेसचा मान राखत अनेकांनी संयम राखला हाेता. मात्र, कार्यकारीणी जाहीर होताच हा संयम सुटला. ज्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाची पदे भूषविली, त्यापैकी अनेकांना संघटनेतूनच डच्चू मिळाला, तर काहींना वरिष्ठ पदं भूषविले असतानाही सन्मानजनक पदे दिली नसल्याचा आरोप होत आहे.

जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना भेटतच नाही. बैठकांचे निरोपही अनेकांना दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातून रविवारपासून राजीनामा सत्र सुरू झाले. सोमवारीही अनेकांनी जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून त्यांनी सोपविलेल्यी नवीन जबाबदारी स्वीकारू शकत नसल्याचे कळविले आहे. यासंदर्भात काँग्रेस जिल्ह्याध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिदास मिळू शकला नाही.

ज्येष्ठ नेत्यांकडून राजीनामे

राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कायम निमंत्रित सदस्य, सचिव, यापदांवरही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील काहींनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले तर अनेकांनी जिल्हाध्यांच्या नावे राजीनामे दिले आहेत.

प्रदेश काँग्रेसने बोलावली बैठक

अकोला जिल्हा काँग्रेसमधील वाद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चौहाट्यावर आल्याने प्रदेश काँग्रेसकडून त्याची तातडीने दखल घेण्यात आली. मंगळवारी मुंबई येथे हाेणाऱ्या बैठकीचे निराेप सरचिटणीसच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवडक पदाधिऱ्यांना देण्यात आले. यात प्रभारी, दाेन्ही जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रदेशस्तरावरील उपाध्यक्ष, सचिव, विविध सेलचे पदाधिकारी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Resignation Session In Congress Akola District News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaCongressresignation
go to top