
Crime; रिसोड पोलिसांनी पाच दरोडेखोरांना पकडले
रिसोड: दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना रिसोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडल्याची घटना १२ सप्टेंबरच्या रात्री तीन वाजता दरम्यान घडली. पाच दरोडेखोरांना चारचाकी वाहन व हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिस स्टेशन अंतर्गत मालमत्तेचे गुन्हे घडू नयेत म्हणून शहरासह ग्रामीण भागात चार वाहनांद्वारे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात येते. दि. १२ सप्टेंबरच्या रात्री रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान वाशीम- बुलढाणा जिल्ह्याचे हद्दीवर रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी तात्काळ भापूर शिवारात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान भापूर गावाच्या शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ इसम वाहनासह संशयास्पद स्थितीत दिसून आले.
पोलिसांना पाहून सदर दरोडेखोर पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एक चाकू, लोखंडी तलवार, दोरी, दोन लोखंडी पाईप, मिरची पूड व एक तवेरा वाहन मिळून आले. एक आरोपी अंधारात पळून गेला, तर पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वाशिम, मेहकर, डोणगाव, जानेफळ पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार आहेत. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.