सतत दोन तास सुरू होता पाऊस; अचानक नदीला आला पूर अन् पर्यायी पुलासह...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

गौतमा नदीही पुढे वागेश्वर जवळ त्रिवेणी संगम विद्रुपा, गौतमा, पूर्णा अशी बनते त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या नदी लगत असलेले बाभूळगाव, तळेगाव पातुडा, वांगरगाव, वाडी अदमपूर, उकळी, पातूरडा-संग्रामपूर ही गावे जोडलेली आहेत.

तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या पुलाचे काम तळेगाव पातुर्डा येथील गौतमा नदीवर सुरू आहे. सोमवारी (ता.15) रात्री आलेल्या सतत दोन तासांच्या पाण्याने या नदीला पूर आला. त्यात पुलाच्या बाजूने शेतीतून केलेल्या वाहतूक साठीचा मार्ग हा पाण्यात वाहून गेला व पूर येण्यापूर्वी मातीत फसलेली एक जीप वाहन काढण्यापूर्वीच वाहून गेल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

पूल खचल्यामुळे आता गावाचा संपर्कही काही काळासाठी तुटला आहे. गौतमा नदीही पुढे वागेश्वर जवळ त्रिवेणी संगम विद्रुपा, गौतमा, पूर्णा अशी बनते त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या नदी लगत असलेले बाभूळगाव, तळेगाव पातुडा, वांगरगाव, वाडी अदमपूर, उकळी, पातूरडा-संग्रामपूर ही गावे जोडलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसात या छोट्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद व गावचा संपर्क तूटत होता. 

हेही वाचा - वीज ग्राहकांनो! तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; इतक्या महिन्याचे भरावे लागणार बिल, हा मिळणार लाभ

परंतु, अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस शासनाच्या काळात सदर पूल मंजूर करून बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर बहुतांश काम झालेही आहे. पंरतु, अचानक 23 मार्चपासून कोरोना च्या संकटात लॉकडाउन आल्याने काम बंद पडले. मध्यप्रदेशातील मजूर गावी निघून गेल्याने काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे सदर नदी पात्रातून पर्यायी केलेला रस्ता सोमवारी आलेल्या रात्रीच्या पावसाने वाहून गेला. मातीत फसलेले वाहन देखील वाहून गेले. त्यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. त्यामुळे पुन्हा मुख्य पुलाचे काम पूर्ण होत नाही तोवर पर्यायी मार्ग बनऊन वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

पर्यायी मार्ग करण्याच्या सूचना
संबंधित कंत्राटदाराने केलेला पर्यायी मार्ग सोमवारी रात्री आलेल्या पावसात वाहून गेला आहे. तातडीने पाहणी करून त्यांना पुन्हा पर्यायी मार्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-संजय बोचे, उपअभियंता, तेल्हारा

अशी आहे पुलाची माहिती
तळेगाव येथील गौतमा नदीवरील पूल 15 मीटरचा असून, त्याची प्रकल्प किंमत ही 9 कोटी 61 लाख रुपये असून, प्रत्यक्ष कामाची सुरुवात मार्च 2019 तर कामाचा कालावधी पूर्ण सप्टेंबर 2020 आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: river was flooded and vehicles along with the bridge were swept away in akola district