अभियंत्यांस हातात फलक देऊन केले खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन

 प्रभाकर पाटील
Saturday, 31 October 2020

रिसोड तालुक्यात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, टक्केवारी खाणारे नेते याला जबाबदार आहेत.

रिसोड (वाशीम) : येथील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारंवार निवेदन देऊनही खराब रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क अभियंत्यांलाच खड्ड्यात उभे करून हातात फलक देऊन अनोखे आंदोलन रीसोड मेहकर रोडवर शुक्रवारी (ता. 30) ऑक्टोंबर रोजी करण्यात आले.

हे ही वाचा : दारू पिताना क्षुल्लक वाद, कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या

रिसोड तालुक्यात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, टक्केवारी खाणारे नेते याला जबाबदार आहेत. वारंवार निवेदन देऊनही याची दखल घेतल्या जात नाही. पॅचेस भरण्याचे कामही काही विशिष्ट ठेकेदारांना  दिले जाते. कामापेक्षा ही दुपटीने बिल काढली जाते. रीसोड मेहकर रोडवर असेच मोठे खड्डे पडले आहेत.

निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम हे खड्डे बुजवण्यात विलंब करत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक प्रभावित होते तर कधी मोठी अपघातही रस्त्यावर घडले आहेत. हा रस्ता पाहण्याकरता आलेल्या अभियंत्यांलाच खड्ड्यात उभे करून, मी या खड्यासाठी व अपघातासाठी जबाबदार आहे, असा फलक हातात घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.

या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, या रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराने केले. त्याला काळया यादीत टाकावे तसेच त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येत्या दोन-तीन दिवसात खड्डे बुजविले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलन करते प. स. सदस्य राहुल बोडखे यांनी दिला आहे. यावेळी राहुल बोडखे, योगेश हुबाड, ज्ञानेश्वर सरकटे, शुभम मवाळ, गणेश बागल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Risod taluka have deteriorated