
RSS स्वयंसेवक ते 4 वेळा आमदार : वाशीमचे लखन मलिक मंत्रीपदापर्यंत जाणार?
वाशीम - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते तब्बल चार वेळा आमदार हा लखन मलिक यांचा प्रवास मंत्रीपदापर्यंत जाणार का? हा एकच प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. राज्यामधे मेहतर समाजाचे एकमेव आमदार असलेल्या आमदार लखन मलिक यांची पक्षनिष्ठा पक्षात बाहेरून आलेल्यांवर वरचढ ठरते की नेहमीप्रमाणे शिस्तीचा डोज देत पक्षविचारधारेचा हवाला दिला जातो हा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता दुताचे पाय धुवून मेहतर समाजाची सेवा केली होती. याचे प्रत्यक्ष कृतीतून उतराई होण्याची बाब भाजप नेतृत्वाच्या गळी उतरेल का? हा प्रश्न मेहतर समाजातूनच विचारला जात आहे.
वाशीम विधानसभा मतदारसंघ तसा पुर्वश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र भाजपने सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हा मतदारसंघ पक्षाचा अभेद्य गड बनविला. या गडाचा अभेद्य बुरूज असलेल्या आमदार लखन मलिक यांनी पक्षाकडे कधीही कोणतीच मागणी केली नाही. या मतदारसंघात तब्बल चार वेळा कमळ फुलविण्याची किमया आमदार लखन मलिक यांनी साधली. साधी राहणी व गोरगरिबांच्या हाकेला ओ देत कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीसाठी सदैव तत्पर असल्यानेच वाशीम विधानसभा मतदारसंघात आमदार लखन मलिक चार वेळा विधानसभेत गेले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारची इतिश्री झाल्यानंतर राज्यात भाजप शिंदे गटाची सत्ता आली. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराचे घोडे अजून अडले आहे. सतत चार वेळा आमदार असलेल्या लखन मलिक यांना आता तरी मंत्रीमंडळात स्थान मिळेल का? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. समाजमाध्यमांवर आमदार लखन मलिक यांचा मंत्रीमंडळात समावेशाची गणिते जोरकसपणे मांडली जात असताना भाजपच्या गोटात चाललेय काय? याचा थांगपत्ता लागत नाही. युवावस्थेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होत पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत या मतदारसंघात भाजपला लिड देणाऱ्या या लोकनेत्याला भारतीय जनता पक्ष आता नाही तर कधी न्याय देणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार पंचवार्षिक काळात कोणत्याही वाद प्रतिवादात न अडकता शालिनतेने सर्वसामान्यांना अर्ध्या रात्री कामास येणारा नेता हा लखन मलिक यांचा गुण पक्ष कधी विचारात घेईल? याची प्रतीक्षा मतदारसंघात आहे.
पंतप्रधानांच्या कृतीला जोड मिळेल काय?
देशामधे स्वच्छतादुत म्हणून मेहतर समाज ओळखला जातो. स्वच्छतेच्या संदर्भात या समाजाचे अतुलनीय योगदान असल्याने गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहतर समाजातील स्वच्छतादुताचे पाय धुवून देशाच्या वतीने या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. राज्यात सर्वच पक्षात आमदार लखन मलिक हे एकमेव मेहतर समाजाचे आमदार आहेत. त्यांनी चार वेळा विधानसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. मेहतर समाजही कायम भाजपचा पाठीराखा असताना पंतप्रधानाच्या कृतीला जोड देण्याचे काम भाजप नेतृत्व करेल काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Web Title: Rss Activists Mla Washim Lakhan Malik Minister Journey Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..