esakal | केसांसह खिशाला लागणार कात्री; या सेवेसाठी मोजावे लागतील अधिकचे दर
sakal

बोलून बातमी शोधा

Mens Saloon in akola.jpg

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत तीन महिने संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.

केसांसह खिशाला लागणार कात्री; या सेवेसाठी मोजावे लागतील अधिकचे दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य सरकारने केशकर्तनालये (सलून), ब्यूटी पार्लर व व्यायामशाळा (जिम) सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. गत ७० दिवसांपासून केशकर्तनालये व ब्यूटी पार्लर बंद असल्याने व व्यवसाय सुरु करताना कोरोनाला अटकाव घालण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यावसायिकांना करावी लागत असल्याने केशकर्तनालयात डिस्पोसेबल साहित्यांचा वापर करण्यात येईल. त्यामुळे केशकर्तनालयात जाणाऱ्यांना सेवेसाठी अधिकचे दर मोजावे लागतील. परिणामी सलूनमध्ये त्यांच्या केसांसह खिशाला दरवाढीची कात्री लागेल.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत तीन महिने संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु त्‍यानंतर सरकारने जनजीवन पूर्वरत करत ‘मिशन बिगीन अगेन’ला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत अनलॉक फेज एक, दोन, तीनद्वारे विविध प्रकारची दुकाने, व्यवसाय, उद्योग सुरु करण्यात आले आहेत. परिणामी अर्थचक्राला गती मिळाली आहे. दरम्यान कोरोना काळातून छोट्या व्यवसायांना बाहेर काढण्यासाठी सरकारने केशकर्तनालये, ब्युटी पार्लर व जिम रविवार (ता. २८) पासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील बहुतांश सलूनची दुकाने सुरु होतील. परंतु दुकान व्यावसायिकांना कोरोनाला प्रतिबंध घालणाऱ्या उपाययोजनांची सुद्धा अंमलबजावणी करावी लागेल. त्यासोबतच डिस्पोजेबल साहित्याचा वापर करुन नागरिकांना सेवा द्यावी लागेल. त्याचा फटका ग्राहकांना बसेल व त्यांना केशकर्तन करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.

अटी व शर्तींचे पालन बंधनकारक

  • केशकर्तनालयाची दुकाने सुरू करण्याची परवानगी देताना कोरोना संसर्ग फैलाव होऊ नये यासाठी काही अटी शर्तींचे पालन करून दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत. त्यामध्ये खालिल बाबींचा समावेश आहे.
  • केशकर्तनालयाची दुकाने, सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये केवळ ज्या ग्राहकांनी पूर्व नोंदणी केली असेल अशा ग्राहकांना प्रवेश देण्यात यावा.
  • सलून व ब्युटीपार्लरमध्ये केवळ कटिंग, डाइंग, वॅक्सींग व थ्रेडींग इत्यादी करण्याकरिता मुभा राहिल.
  • सलून व ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोव्हज, एप्रॉन व मास्क वापरणे बंधनकारक राहील.
  • ग्राहकांसाठी डिस्पोसेबल टॉवेल, नॅपकिन्सचा वापर करणे बंधनकारक राहिल. प्रत्येक सेवेनंतर नॉनडिस्पोसेबल उपकरणांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
  • सलुनमध्ये काम करणारे कर्मचारी आणि ग्राहकांसाठी इन्फ्रा-रेड थर्मामीटरचा वापर करण्यात यावा, कोणत्याही व्यक्तीस लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.