शेतकऱ्याने फिरविला पाच एकरांतील उभ्या पिकावर ट्रॅक्टर

पंजाबराव ठाकरे 
Friday, 9 October 2020

सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे.

संग्रामपूर (बुलडाणा/अकोला) : सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने खारपाण पट्ट्यातील सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च डोईजड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यातील निरोड येथील शेतकऱ्याने पाच एकरातील सोयाबीन पिकावर शुक्रवारी (ता.नऊ) ट्रॅक्टर फिरवला.

निरोड बाजार गावातील शेषराव भाऊराव अवचार यांनी आपल्या २८९ गट नंबर मधील पाच एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरने मोडले. यंदा सोयाबीन पेरणीपासूनच या पिकाला निसर्गाची नजर लागली. पावसाने नको त्यावेळी केलेला कहर खारपाण पट्ट्यातील सर्वच पिकांना मारक ठरला आहे. सोयाबीनचे पीक चांगले येईल या आशेने जिवापाड मेहनत करून उसनवारी, उधारी करून सोयाबीनची मशागत केली. शेंगा भरणीच्या वेळी निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला. यामुळे सोयाबीनची उभी झाडे करपली. 

सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे. एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा लागत आहे. मशागतीचा एकंदरीत खर्च जवळपास एकरी १४ हजार रुपये लागलेला आहे. उतारा लागत नसल्याने मळणी यंत्रधारकांनी एकरी हजार रुपयांचे दर काढले आहेत. सोंगणी, काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन सोंगणी करावी की नाही, या द्विधा मनस्थितीत या भागातील शेतकरी अडकला आहे.

शासन आणि विमा कंपनीकडे नजरा

कोरोनामुळे हातघाईस आलेल्या शेतकऱ्याला सोयाबीन पिकाचा आधार होता. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्च याचा उत्पन्नाच्या हिशोबात ताळमेळ लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये वर्षभराचा आर्थिक गाडा चालवावा तरी कसा, याची चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागून आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पीक विम्याच्या माध्यमातून विमा कंपनीकडून आणि शासनाकडून मदतीची मोठी आस लागून आहे. यासाठी विरोधी पक्षांकडून हा मुद्दा रेटून धरणे गरजेचे झालेले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Sangrampur, a farmer turned a tractor on a vertical crop of five acres