शासन निर्देशानुसारच शाळा सुरु होणार, असे आहेत शासनाचे निर्देश

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 June 2020

शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील शाळा त्याच पद्धतीने सुरु करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

अकोला :  शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील शाळा त्याच पद्धतीने सुरु करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्ह्यातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याबाबत नियोजन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडके तसेच सर्व उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

पंधरवाडा राबविणार
शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने पूर्व तयारी पंधरवडा राबवावयाचा आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समितीची (ऑनलाईन) सभा आयोजित करणे, पाठ्यपुस्तक वितरण, शाळेच्या इमारतीचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, गटागटाने पालकांच्या सभा घेणे, शाळा बाह्य मुलांच्या घरी भेटी देणे, शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाचे अद्यावतीकरण करणे. ग्रामपंचायतींच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर यांची सुविधा उपलब्ध करुन मुलांना मदत करणे, गुगल क्लासरुम, वेबिनार, डिजीटल शिक्षणासाठी शिक्षक व पालकांचे सक्षमीकरण करणे, दीक्षा ॲपचा प्रसार, ई-कन्टेंट निर्मिती इ. बाबत तयारी करण्यात येणार आहे.

असे आहेत शासनाचे निर्देश
यावेळी शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ सुरु करण्याबाबत शासनाने १५ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती देण्यात आली. त्यानुसार शाळा ह्या टप्प्या-टप्प्याने सुरु करताना प्रथम जुलै महिन्यात इयत्ता ९ वी, १० वी व १२ वी वर्ग सुरु होतील. त्यानंतर ऑगस्टमध्ये इयत्ता ६वी ते ८वी चे वर्ग सुरु होतील. सप्टेंबरमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरु होतील. इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग केव्हा सुरु करायचे याबाबत स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. तसेच इयत्ता अकरावीचे वर्ग इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school will start as per the government directives akola marathi news