बिल्डरांच्या स्वार्थापायी अडले सांडपाणी, गौरक्षण रोड सहकारनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पाण्याला सुटली दुर्गंधी

मनोज भिवगडे
Friday, 7 August 2020

गौरक्षण रोडवरील चार बंगल्याच्या बाजूला नाल्याचे पाणी अडल्याने सहकारनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाचे पडणारे पाणी व सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने पाणी साचले. त्यातू दुर्गंधी सुटली आहे. बिल्डरांच्या स्वार्थापोटी या भागातून पाणी काढण्यासाठीही जागा शिल्लक नाही.

अकोला  ः गौरक्षण रोडवरील चार बंगल्याच्या बाजूला नाल्याचे पाणी अडल्याने सहकारनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाचे पडणारे पाणी व सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने पाणी साचले. त्यातू दुर्गंधी सुटली आहे. बिल्डरांच्या स्वार्थापोटी या भागातून पाणी काढण्यासाठीही जागा शिल्लक नाही.

गोरक्षण रोडवरील सहकारनगर परिसरात रोडलाच लागून असलेल्या चार बंगल्याजवळील विहिर व रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी थेट रस्त्यापर्यंत येत आहे. परिणामी या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे गौरक्षण रोड तर दुसरीकडे बिल्डरांनी उभे केलेल्या इमारती व विकलेल्या जागा. यामुळे या भागातील पाणी काढून पुढे नेण्यासाठी जागाच शिल्लक नाही. पाणीच तेथेच साचून राहत असल्याने त्यातून आता दुर्गंधी सुटली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

घोडदौड रस्त्या व नाल्यावर अतिक्रमण
गौरक्षण रोडवर इंग्रजकालीन घोडदौर रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या बाजूनेच एक मोठा नालाही होता. पूर्वी या नाल्यातून पावसाचे स्वच्छ पाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यापर्यंत जात होते. हळूहूळू या भागात वस्ती झाली आणि घोडदौड रस्त्यावर व नाल्यावर अतिक्रमण झाले. प्लॉटपाडून बिल्डरांनी ते विकून टाकले. ज्या नाल्यातून पाणी वाहत होते, तो नालाच बुजवण्यात आला.

सांगा ३० फुट खोल खोदून सांडपाणी चढवायचे कसे?
महापालिके वतीने या भागातील पाणी उलट्या दिशेने काढण्याचा प्रयत्नही झाला. चढावरून नाला तयार करीत जागा समतल करून पाणी पुढे काढण्यासाठी तब्बल ३० फुट खोल नाला खोदकामाचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ४८ लाखांचे अंदाजपत्रकही तयार झाले होते. मात्र भरवस्तीतून ३० फुट खोल नाला खोदणे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणारा असल्याने मनपाच्या अभियंत्यांनी त्याला मंजुरी दिली नाही.

दोन फुट जागेतून निघू शकतो मार्ग
गोरक्षण रोडवरील चार बंगला परिसरात दोन फुट जागा नाला बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास या परिसरात बंगल्याच्या बाजूलाच साचणारे पाणी पुढे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून काढता येणार आहे. परिसरातील सांडपाण्याचा प्रश्चच या दोन फुट जागेतून निकाली निघू शकतो. मात्र या दोन फुट जागेने बिल्डरांचे मोठे नुकसान होणार असल्याने कुणीही जागा देण्यास तयार नाही.

पूर्वीच्या घोडदौड रोडचे शिलालेख आजही उपलब्ध असलेल्या जागेवर व परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास जागा नाही. दोन फुटाची जागा मिळाल्यास नाल्याचे बांधकाम करून पाणी पुढे काढता येऊ शकते. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.
- बाळ टाले, माजी मनपा स्थायी समिती सभापती व नगरसेवक, प्रभाग क्रमांक १५
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selfish obstruction of builders in Akola Sewage, endangering the health of citizens in Gaurakshan Road Sahakarnagar; The stench escaped the water