फेसबुक मैत्रिणीसाठी सोडला नवरा

भगवान वानखेडे 
Thursday, 30 July 2020

लाॅकडाउनमध्ये उडाला कुटुंब कलहाचा भडका ः भरोसाने दिली सुरक्षेची हमी

अकोला  ः कोरोनाचा परिणाम केवळ आरोग्यावर झाला नसून, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थेवरही विपरीत परिणा झाला आहे. अशातच लाॅकडाउनच्या काळात कुटुंब कलहाचा भडका उडाला असतानाच एका विवाहित स्त्रीने तिच्या फेसबुक मैत्रिणीसाठी चक्क आपला नवराच सोडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशातच अकोला पोलिस विभागाच्या भरोसा सेलने त्या विवाहितेचे योग्य ते समुपदेशन करून तिला महिला वसतीगृहात आसरा मिळवून दिला आहे. 

माणुस हा समाजशील प्राणी आहे, हे आपण अनेकवेळा ऐकले असेल आणि वाचलेही असेल. मात्र, कोरोनाने अख्खा समाजच लाॅकडाउन करून टाकला आहे. तेव्हा याच समाजशील प्राण्याची घुसमट अनेक रुपाने बाहेर पडल्याचे दिसून आले. याच कोरोना लाॅकडाउन दरम्यान कुटुंबातील लहान-सहान कलहामुळे अनेकीनी महिला समुपदेशन कक्षाची पायरी चढली खरी. मात्र, याच दरम्यान एका महिलेची फेसबुक एका महिलेशी ओळख झाली. दोघी बोलायला लागल्या. बोलता-बोलता मैत्रित रुपांतर झाले आणि एकमेकींचे दुःख एकमेकींनी शेअर केले. मात्र, विवाहित असलेली शहरातील महिला त्या फेसबुक मैत्रिणीच्या ऐवढ्या प्रभावात गेली की, तिने दोन वर्षाची मुलगी आणि कमावता नवरा सोडण्याचा निर्णय घेऊन माहेर गाठले. माहेरच्या मंडळीनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. 

भरोसा सेलने   दिली सुरक्षेची हमी
फेसबुक मैत्रिणीच्या प्रभावात आलेल्या त्या विवाहितेला माहेरच्या मंडळीनी  अकोला पोलिस विभागाच्या भरोसा सेलमध्ये आणले. या कक्षाच्या प्रमुख एपीआय प्रणिता कराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेचे योग्य ते समुपदेशन करून त्या महिलेला सुरक्षेची हमी देत शहरातील एका प्रतिष्ठीत वसतीतील महिला वसतीगृहात आसरा दिला आहे. 

टाळेबंदीत 122 जणींनी चढली मतनीची पायरी
22 मार्च ते 27 जुलै दरम्यान महिला तक्रार निवारण कक्षात एकूण 122 प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये 43 प्रकरणात समझोता करण्यात आला असून, 31 प्रकरणात गुन्हे, दोन प्रकरणे इतर जिल्ह्यात ट्रान्सफर केले आहेत. तर 62 प्रकरण बंद करण्यात आली असूनस 24 प्रकरणात महिलाना कायद्यान्वये सुरक्षा दिली आहे. 

टाळेबंदीत कुटुंब कलहाची प्रकरणे कमी दाखल झाली आहेत. टाळेबंदीत महिला सुरक्षेसाठी सर्व पोलिस ठाण्यांसह भरोसा सेल सुरुच होते. मात्र, अनलाॅकमध्ये या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. मात्र, तरीही भरोसा सेल या प्रकरणामध्ये लक्ष घालून हे प्रमाण कमी कसे होईल याकडे लक्ष देणार आहे. 
-प्रणिता कराळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल.

लहान-सहान कारणांनी कुटुंब कलह होत असतात, मात्र, कोरोनाने मानसिकतेवरही परिणाम केला आहे. मात्र, कोरोना आणि टाळेबंदी ही कायम राहणार असे नाही. तेव्हा व्यवस्थापण करा, एकमेकांची जबाबदारी ओळखा आणि संयम आणि समजून जीवन जगावे. 
-डाॅ. अमोल केळकर, मानसोपचार तज्ज्ञ, अकोला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She left her husband for a Facebook girlfriend