
अकोला : मंगरुळपीर-अकोला रस्त्याची चाळणी
मंगरुळपीर - मंगरुळपीर ते अकोला रस्त्यावर वाघा फाट्याजवळ दीड किलोमीटर पडलेल्या खड्यांमुळे या ठिकाणी प्रवास करणे धोकेदायक नव्हे तर, जिवावर बेतण्यासारखे झाले आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्यातून दुचाकी, चारचाकी, एसटी, अवजड वाहने देखील चालवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याच्या मध्यभागी एक ते दीड फुट खोल खड्डे पडले असून, यात दुचाकी आणि चारचाकी वाहने आपटून अपघात होत आहेत. असे असताना मंगरुळपिर, मूर्तिजापूरच्या आमदारांनी झोपेचे सोंग घेतले काय? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यांना रस्तेविकास महामंडळाच्या अभियंत्यांना जाब विचारणेही गरजेचे वाटत नाही का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्तेविकास महामंडळाने मंगरुळपिर ते अकोला हा रोड सिमेंट काँक्रीटचा बनविला परंतु फेटरा फाट्यापासून वन विभागाच्या वतीने परवानगी देण्यात न आल्याने कासमारपर्यंत त्या रोडचे डांबरीकरण करण्यात आले. पुढे कासमारपासून वाघा फाट्यापर्यंत पुन्हा सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविला आणि वाघा फाट्यापासून जवळपास दीड किलोमीटर वनविभागाने आडकाठी केल्याने सदर रस्ता जैसे थे त्या परिस्थितीत ठेवल्याने या दीड किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.
वाघा गावापासून रस्त्यावर खड्यांची मालिकाच सुरू होते. त्यात पावसाळ्यात खड्यांत पाणी साचलेले असते. अनेक ठिकाणी खड्यांचा आकार एवढा मोठा आहे की, त्यातून ट्रक बाहेर काढणे कसरतीचे ठरत आहेत. रात्री अनेक दुचाक्यांच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणाहून प्रवास करताना जीव मुठीत धरून वाहन चालकांना वाहने चालवावी लागतात.मंगरुळपिर येथून अनेक रुग्ण उपचारासाठी अकोला येथे जातात अनेकवेळा गंभीर रुग्णांचा अकोल्याला जातांना या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर उपचाराविनाच मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून केल्या जात आहे.
सदर दीड किलोमीटरचा भाग हा काटेपूर्णा अभयारण्यमध्ये येतो आणि ते अकोला वनविभागाच्या अखत्यारीत येते. फेटरा फाटा ते कासमार हे क्षेत्र वाशीम वन विभागाच्या अखत्यारीत येते. वाशीम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथील परवानगी दिली आणि तो रस्ता पूर्ण झाला, जंगली जनावारांचा वावर म्हणून अकोला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत परवानगी दिली नाही, मागील सात वर्षांपासून नागपूर येथील वनविभागाशी याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु रस्ते विकास महामंडळाकडून सदर दीड किलोमीटरच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची परवानगी येत्या आठ ते दहा दिवसांत येऊ शकते त्यानंतरच काटेपूर्णा अभयारण्याच्या या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सुरू होईल.
- रावसाहेब झालटे, कार्यकारी अभियंता, रस्तेविकास महामंडळ, अकोला.
Web Title: Sieve Of Mangrulpeer Akola Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..