कोरोनाचा धोका पत्कारून भावासाठी बहिण बाजारात

भगवान वानखेडे 
Wednesday, 29 July 2020

धू प्रेम असलेल्या काही महिला भाऊरायांसाठी आकर्षक आणि सुंदर, सुबक राखी खरेदी करण्यासाठी बाजारात फिरताना दिसत आहेत.

अकोला  ः आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊ-बहिणींचा पवित्र सण रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठ फुलली आहे. रंगबेरंगी आणि तेवढ्याच आकर्षक अशा राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. याच राख्या खरेदीसाठी सध्या कोरोनाचा धोका पत्कारून बहिणी बाजारात फिरत आहेत. एकीकडे बंधू प्रेम आणि दुसरीकडे कोरोनाचे संकट या द्विधा स्थितीत अडकलेल्या महिलांनी स्वतःची काळजी घेऊन खरेदी करावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोरोनाने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. यामध्ये सण-समारंभाचाही समावेश आहे. सगळेच सण समारंभ शक्य तेवढ्या साध्या पद्धतीने साजरे करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. बहिण-भावांचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडला असून, हा सणही साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही बंधू प्रेम असलेल्या काही महिला भाऊरायांसाठी आकर्षक आणि सुंदर, सुबक राखी खरेदी करण्यासाठी बाजारात फिरताना दिसत आहेत. ही बाब धोकादायक जरी असली तरी तोंडावर मास्क, हाती सॅनिटायझर आणि फिजीकल डिस्टन्स पाळून खरेदी करण्यास काहीही हरकत नसली तरी यंदा तरी हा सण साधेपणाने साजरा करावा असे मत सुजान नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

यंदा माहेरी येण्यास निर्बंध
नागपंचमी सणांपासून सुरू होत असलेल्या विविध सणांना यंदा कोरोनाचा फटका बसला आहे.पूर्वीपासून रक्षा बंधन, गौरी-गणपती आणि दसरा-दिवाळीला सासरवासीन महिला माहेरी येत असत. मात्र, यंदा कोरोनामुळे एसटी बस आणि जिल्हाबंदी असल्याने यंदा माहेरी येण्यावर निर्बंध बसणार आहेत. तेव्हा आॅनलाइन पद्धतीनेही हे सण साजरे केलेले बरे.

फ्रेंडशीप डेलाही बसणार फटका
आॅगस्टमधील पहिला रविवार म्हणजे जागतिक मैत्रि दिवस. तेरी मेरी यारी.....म्हणत मित्रांसाठी गिफ्ट खरेदी करणे, फ्रेंडशीप बॅंड बांधणे, बाहेर पिकनिकला जाणे हे प्रकार या दिवशी तरुणाई करीत असते. मात्र, यंदा या दिवसावरही निर्बंध आले असून, तरुणांनी या दिवशी आनलाइन चॅटींगद्वारे मैत्रिचा दिवस साजरा करणे हिताचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister market for brother at risk of corona