esakal | मलकापूरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सोडले साप; अनेकांचा जीव टांगणीला

बोलून बातमी शोधा

Snake
मलकापूरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सोडले साप; अनेकांचा जीव टांगणीला
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मलकापूर (बुलडाणा) : गावातील वस्तीतून पकडलेले विषारी, बिन विषारी साप जंगल परिसरात न सोडता थेट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार २९ एप्रिल रोजी घडला असून यासंदर्भात त्या सर्प मित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली असून या प्रकारामुळे आता अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.

शहरातील मध्यभागी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत कोवीड केअर सेंटर असून या सेंटरमध्ये कोरोना बाधित भरती रुग्णांवर उपचार केला जातो. तसेच अनेक जण येथे कोरोना चाचणीकरिता दिवसभर रांगेत उभे असतात. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील एका अक्रम नामक सर्पमित्राने उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात काही विषारी व बिन विषारी सर्प पिशवीत आणून सोडले.

हा प्रकार सुरू असतानांच उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी परिसराची साफसफाई करीत होते. दरम्यान एकामागून एक काही साप त्यांच्या निदर्शनास पडले असता त्यांनी एवढे साप कसे निघत आहेत या बाबीचा शोध घेत पाठीमागच्या परिसरात गेले असता हा अक्रम नामक तरूण तेथे साप असलेल्या पिशवींसह आढळून आला. त्याला कर्मचाऱ्यांनी हटकले व संतापही व्यक्त केला.

यापूर्वीही त्याने असा विकृत प्रकार केलेला आहे. त्याला समज देऊनही त्याने हा प्रकार पुनश्च केलाच. सर्पमित्रच्या नावावर शहरातील दाट वस्तीत अथवा कोठेही साप निघाल्यास हा तरुण सदर साप पकडतो व या सापांना जंगलात सोडून देण्याकरिता स्थानिकांकडून पाचशे ते सहाशे रुपये गाडी पेट्रोल करिता घेत असतो. असे असतानांही ते पकडलेले साप तो जंगलात सोडत नाही तर या सापांना पकडून तो घरी पिशवीत गोळा करून ठेवतो व त्यानंतर मिळेल त्या सोयीच्या ठिकाणी त्या सर्वांना हा अर्धमेल्या अवस्थेत सोडून टाकत असावा असाच अंदाज या घटनेवरून येत आहे. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात आलेल्या वीस ते पंचवीस सापांपैकी पैकी काही विषारी तर काही बिनविषारी होते.

महत्त्वाचे म्हणजे यातील आठ ते दहा साप मृतावस्थेत होते. तर काही अर्धमेल्या अवस्थेत होते. त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर यातील काही जिवंत असलेले विषारी साप त्याला पुनश्च कर्मचाऱ्यांनी पिशवीत भरण्यास भाग पाडले. व ते साप कर्मचाऱ्यांनी शेत शिवार परिसरात नेऊन सोडले तर मृत असलेल्या सापांना जमिनीत गाडून टाकले. तसेच येथे आता दिसू नकोस अशी तंबी त्या सर्प मित्राला दिली.

दरम्यान घाबरलेल्या अवस्थेत त्या सर्पमित्राने या परिसरातून पळ काढला. घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता कर्मचाऱ्यांसह भरती असलेले रुग्ण, व कोरोना तपासणी करीता दैनंदिन रित्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात येणाऱ्या रुग्णांच्या मनात आता चांगलीच धडकी भरली असून या विकृत सर्प मित्रावर काय कारवाई होते हे पाहणे आता औत्सुक्याचे झाले आहे.

बातमीदार : अशोक रवणकार