सावधान : पुढील वर्षी सोयाबीनचे बियाणे होणार दुर्मिळ; बियाणे कंपन्यांचा महाराष्ट्राला नकार 

राम चौधरी
Tuesday, 21 July 2020

आता शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मिळण्यास अडचण निर्माण होणार असून, गुजरातच्या बियाणे उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रातील वितरकांना पुढील खरीप हंगामात बियाणे पुरविण्यास नकार कळविला आहे. न उगवलेल्या बियाण्याच्या संदर्भात बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने या कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

वाशीम : राज्यामध्ये कापसाऐवजी सोयाबीन हे मुख्य पीक झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. मात्र आता शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मिळण्यास अडचण निर्माण होणार असून, गुजरातच्या बियाणे उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रातील वितरकांना पुढील खरीप हंगामात बियाणे पुरविण्यास नकार कळविला आहे. न उगवलेल्या बियाण्याच्या संदर्भात बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने या कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

राज्यामध्ये सोयाबीन पिकाखाली पन्नास टक्केच्यावर क्षेत्र आहे. दरवर्षी त्यामधे वाढ होत आहे. अवर्षण आणी जास्त पावसाच्या परिस्थितीत हे पीक तग धरत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश पश्‍चिम महाराष्ट्राचा पर्जंन्यछायेचा भाग सोयाबीन पिकाने व्यापला आहे. सोयाबीनची लागवड करणारे शेतकरी दरवर्षी खरिप हंगामात कृषी सेवा केंद्रांमधून प्रमाणीकरण झालेले बियाणे खरेदी करून पेरणी करतात. त्यामुळे सोयाबीन पिशवीची विक्री खरिप हंगामात महत्त्वाची आर्थिक उलाढाल असते. आता मात्र शेतकऱ्यांना पुढच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची चणचण भासणार आहे. सध्या निकृष्ठ बियाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरात येथील बियाणे उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रात सोयाबीन बियाणे विक्रीस नकार कळविला आहे. राज्याच्या सोयाबीन बियाणे आयातीत गुजरातच्या बियाण्याचा 30 टक्के तर मध्यप्रदेशचा 50 टक्के वाटा आहे. गुजरात नंतर मध्यप्रदेशातील बियाणे उत्पादक कंपन्या गुजरातची री ओढणार असल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 

महाबीजचा लागणार कस
राज्यामध्ये बियाणे वितरणात महाबीजचा कधीकाळी 80टक्के वाटा होता आता तो सिमित झाला आहे. खासगी कंपन्यांनी बियाणे पुरविले नाही तर महाबीज शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे पुरविण्यास समर्थ आहे का, हा प्रश्न आहे.

 

शेतकऱ्यांची लुटच
महाबीज बिजवाई प्लॉटधारक शेतकऱ्यांकडून बियाण्याचे सोयाबीन डिसेंबरच्या बाजारभाव सरासरीमधे 3500 ते 3700 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करते. प्रोसेंसिंग, टॅगिंग व वाहतूक खर्च व नफा धरला तर प्रतिकिलो सरासरी पंधरा रूपये खर्च येतो. यामधे हे सोयाबीन बियाणे 50 रुपये प्रतिकिलो मिळावयास पाहीजे. 30 किलोची एक पिशवी 1500 रुपयाला मिळाली पाहीजे; मात्र महाबीजची तीस किलोची पिशवी 2150 रूपयाला विकली गेली. यामधे शेतकरीच भरडला जात आहे.

 

संपादन - अनुप ताले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean seeds will be rare next year