ST strike | एसटी संपावर, डल्ला प्रवाशांच्या खिशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिसोड : एसटी संपावर, डल्ला प्रवाशांच्या खिशावर

रिसोड : एसटी संपावर, डल्ला प्रवाशांच्या खिशावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ४ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटी बंद असल्याचा फायदा खासगी वाहनधारकांनी घेत चक्क दुपटीने भाडेवाढ करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून सुसाट वेगाने प्रवासी वाहतूक केली जात आहे. यामध्ये अपघाताची भिती व्यक्त केली जात असून, वाहतूक शाखा मुकदर्शक झाली आहे.

४ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे हा संप चिघळला असून, प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व प्रवाशांचे हाल थांबविण्यासाठी शासनाने ९ नोव्हेंबरपासून खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. यामध्ये खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. खासगी वाहतूकदार मात्र, याच संधीचा मोठा फायदा घेत प्रवाशांकडून दामदुपटीने प्रवासी भाडे घेत प्रवाशांची मोठी लूट होत करीत आहेत. चक्क दुपटीने भाडे वाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. येथून पुणे मुंबई या लक्झरी वाहतूकदारांनी तर, चक्क तीनपट भाडेवाढ केली आहे. रिसोड ते पुणे दोन हजार रुपये भाडे घेतले जात आहे. अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबल्या जात असून, ही वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. प्रवासी नाईलाजाने मुठीत जीव धरून प्रवास करीत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणारी ही वाहने सुसाट वेगाने धावत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने प्रवाशांचे होत असलेले हाल याचा विचार करून एसटीच्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढावा व प्रवाशांचे होत असलेले हाल व आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या चालक वाहक व कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत अवैध वाहतूक करणाऱ्यांनी प्रवाशांना नाडणे सुरू केले आहे. दर २० किलोमीटरमागे दुपटीहून अधिक भाडेवाढ करण्यात आली आहे. या भाडवाढीबरोबरच प्रवाशी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशी वाहनात कोंबले जात आहेत. चार प्रवाशी क्षमता असलेल्या तीन चाकी वाहनात दहा ते बारा प्रवाशी कोंबले जातात. कालीपिली टॅक्सी तर बेजबाबदारपणाचा कळस ठरत आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी चौकाचौकांत केवळ मुकदर्शक बनले आहेत.

loading image
go to top