संघर्ष! बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर झाल्या शमीम बानो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष! बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर झाल्या शमीम बानो

संघर्ष! बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर झाल्या शमीम बानो

अकोला : परिस्थिती कशीही असली तरी आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास सर्व अडचणींवर मात करता येते, हे अकोट फैल परिसरातील शमीम बानो या महिलेने कृतीतून सिद्ध केले आहे. आपल्यासोबतच दारिद्र्यात खितपत पडलेल्या इतर महिलांनाही योग्य मार्ग दाखवीत बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक सुबत्ता मिळविली आहे.

शमीमच्या संघर्षाची सुरुवात झाली ती अगदी चौदाव्या वर्षी झालेल्या लग्नातून. पंधराव्या वर्षी एक मुलं झाल्यानंतर नवऱ्याने तलाख दिला. त्यानंतर त्या वडील अनवर खान यांच्याकडे परत आल्या. दूध न तुटलेल्या काखेतील बाळाला घेऊन आलेल्या शमीम बानो यांच्यामुळे आधीच आठ बाय दहाच्या खोलीत जगणाऱ्या कुटुंबात आणखी दोन जीवांची भर पडली. त्यातही शमीम यांचे शिक्षण जेमतेम असल्याने नोकरी-कामधंदा काय करावा प्रश्नच होता.

हेही वाचा: अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

घरकामे, शेतीची मजुरी असे हाताला पडेल ते काम करीत शमीम यांनी कुठल्याही परिस्थितीत वडिलांवर बोझ न होण्याचे ठरवले. शमीम यांच्या कानावर महानगरपालिकेच्या बचत गटांची माहिती पडली आणि तेथून आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. स्वतःसोबतच त्यांनी घराजवळच्या काही दारिद्र्य रेषेखालील व काही अल्पसंख्याक महिलांना घेऊन शबनम महिला बचत गट नावाने गट सुरू केला. काहीच कालावधीत थोडे पैसे उचलून ठोक बाजारातून लहान मुले व महिलांचे रेडीमेड कपडे घेऊन गल्लीत विकायला सुरुवात केली.

बऱ्यापैकी विक्री होत असल्याचे दिसताच बानो यांचा व्यवसाय मोबाईलवरूनही सुरू झाला. प्रतिसाद वाढल्याने त्यांनी थेट सुरत मार्केट मधून कपडे खरेदीला सुरुवात केली. कापडाच्या व्यवसायातून बऱ्यापैकी रक्कम जमा झाल्यावर बानो यांनी बचत गटाच्या माध्यमातून शहरातील नायगाव भागातील उर्दू शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम मिळवून गटातील इतर महिलांना सुद्धा रोजगार मिळवून दिला.

हेही वाचा: पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

पोषण आहार पुरवठ्याचा शमीम यांचा हा अनुभव त्यांना महिला व बालकल्याण विभागाचे एक मोठे काम मिळवून देण्याच्या कामी आला आहे. पाच वर्ष कालावधीच्या या मोठ्या कामापोटी शमीम बानो यांनी लाखोंच्या प्रोसेसिंग व पॅकेजिंग मशीन खरेदी केल्या आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या या बचत गट चळवळीमुळे शमीम यांच्याकडे आता चांगल्या प्रमाणात पैशांची आवक जावक वाढली आहे. घरात सुबत्ता वाढली आहे.

कच्याचे पक्के घर होण्यासोबतच खोल्यांची संख्याही वाढली आहे. उद्योगाच्या मशनरी सोबतच टीव्ही, फ्रीज, कुलर सारख्या वस्तूही घरात आल्या आहेत. पोटचा पोरगा आता चांगल्या शिक्षण संस्थेतून फार्मसीचे शिक्षण घेतो आहे. वडिलांना भार वाटणाऱ्या शमीम बानो आता कुटुंबाचा आधार झाल्या आहेत. आज रोजी पंचवीस महिला बचत गटाच्या फेडरेशन असणाऱ्या उडाण वस्तीस्तर संघाच्या त्या अध्यक्ष आहे.

हेही वाचा: गोड खाण्याची सवय सोडायची? तर करा याचा अवलंब

कशी झाली मदत?

शहरी गरीब महिलांना मदत करण्यासाठी महानगरपालिकेचा राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नामक एक स्वतंत्र विभाग असल्याचे शमीम यांना माहीत पडल्याने त्याचा शोध घेत असतानाच या विभागाच्या समुदाय संघटिका त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. किमान दहा महिला एकत्र येऊन शंभर-शंभर रुपये गोळा केले तरी महिन्याकाठी हजार जमा होतात. नियमित सहा महिने बँकेत बचत केली तर महानगरपालिकेचे अभियान त्यात दहा हजार रुपये फिरता निधी देते. यामधून कुणालाही पैशांची गरज पडली तर दहा-पंधरा हजार कुठलेली तारण वा लिखापडी न करता लागलीच नाममात्र व्याजदरात उचलता येतात. ही कल्पनाच त्यांना खूप पटली. त्यातूनच त्यांना आर्थिक मदत झाली.

Web Title: Start Business Self Help Group Shamim Bano Ideal For Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..