Akola : निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; आरक्षण सोडतीकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission

निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; आरक्षण सोडतीकडे लक्ष

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा : नांदुरा तालुक्याच्या आगामी चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भावी उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, आपआपल्या सर्कलमध्ये भेटीगाठीला त्यांनी सुरुवात केली आहे. असे असतांना अजूनही कोणतेच आरक्षण लागू न झाल्याने सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या असून कोणते आरक्षण कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाची निराशा होईल, हे आगामी काळात समजणारच आहे. मात्र, आता थंडीच्या वातावरणातही राजकीय वातावरण हळूहळू गरम होऊ लागले आहे. त्याकरिता राजकीय पक्षाच्या आजी-माजी आमदार व पदाधिकाऱ्यांकडून पक्षातील कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू झाली असून जो-तो आपलेच वर्चस्व असल्याचे आपल्या नेत्याला पटवून देण्यात मशगुल आहे.

नांदुरा तालुक्यात १०८ गावे असून चार जिल्हा परिषद सर्कल तर ८ पंचायत समिती गण आहेत. जिल्हा परिषद सर्कलचा विचार करता निमगाव, चांदुरबिस्वा, वडनेर-टाकरखेड तर दहिवडी हे सर्कल असून, निमगाव सर्कलमधून भाजपाचे मधुकर वडोदे निवडून आले असतांना मध्यंतरी त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. तर दहिवडी सर्कलचे नेतृत्व काँग्रेसच्या यशोदा बलदेवराव चोपडे यांचेकडे असून, काँग्रेसचेच संतोषराव पाटील चांदुर बिस्वा सर्कलचे नेतृत्व सांभाळत आहेत.

सोबतच वडनेर-टाकरखेड जिल्हा परिषद सर्कल शिवसेनेच्या सुनंदाताई वसंतराव भोजने यांच्याकडे आहे. पंचायत समितीच्या आठ गणांपैकी निमगावमधून भाजपाचे प्रभाकर वानखडे, अलमपूर गणातून अगोदर काँग्रेसच्या व आता भाजपवासी झालेल्या अर्चना पाटील, दहिवडीमधून काँग्रेसच्या नीता धांडे, वसाडीमधून शिवसेनेच्या सुनीता डीवरे, धानोरा गणातून अगोदर काँग्रेसच्या व आता भाजपात दाखल झालेल्या योगिता गावंडे, टाकळी गणातून शिवसेनेचे गजानन गव्हाळे, वडनेर गणातून काँग्रेसचे हाफिज मुन्शी तर टाकरखेड गणातून शिवसेनेच्या वैशाली जाधव त्या त्या गणाचे नेतृत्व करीत आहेत.

आगामी निवडणुकीत आता तरी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हा परिषद गटांमध्ये मोर्चे बांधणीला बळ दिले असून, भेटीगाठीचे दौरे सुरू केले आहे. मात्र, आरक्षणाचे गणित अद्यापही बाकी असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण हे कोणत्या प्रवर्गासाठी कोणता मतदारसंघ सुटणार हे आगामी काळातच समजणार आहे. परंतु, कोणत्याही गटाचे आरक्षण राखीव राहिल्यास संबंधित राखीव गटातील उमेदवारांना उभे करून त्याला निवडून आणून त्याच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून गटावर आपलेच वर्चस्व असल्याचा चंग अनेक नेत्यांनी बांधला आहे.

सगळ्यांचा स्‍वबळाचा नारा

नांदुरा तालुक्यात फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते सध्या स्वतंत्र लढण्याचा नारा असून, आगामी काळात कोण कोणाशी कशी युती करणार हे दिसून येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाचे जास्त उमेदवार निवडून यावेत यावर आजी-माजी आमदारासह विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सध्या तरी भर देणार आहे.

loading image
go to top