esakal | शासनाची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनीच केली रस्ता दुरूस्ती
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनीच केली रस्ता दुरूस्ती

शासनाची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनीच केली रस्ता दुरूस्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पांगरी नवघरे (जि.वाशीम) ः पांगरी नवघरे सह परिसरातील रस्त्याची दखल न घेतल्यामुळे अनेक रस्ते इतिहासजमा होत आहत, तरी काही रस्त्यांसाठी मारामारी होईपर्यंत परिस्थीती निर्माण होते. तरीही शासन दखल घेत नसल्याने पांगरी येधील शेतकऱ्यांनी स्व:त पुढाकार घेत लोकवर्गणीतून शेतरस्ता तयार केला आहे.

पांगरी नवघरेसह परिसरातील पाच रस्त्यांपैकी एक रस्ता असलेला कसार पाणंद या रस्त्याचे खडीकरण हे तेथील सर्व शेतकऱ्यांनी एकरी, तसेच ज्याला सुचेल, झेपेल अशा पद्धतीने कोणी पाच हजार, सहा हजार, दोन हजार याप्रमाणे वर्गणी करून स्वखर्चातून कसार पाणंद रस्त्याच्या डागडुजीला तिकडे जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली. ९९ टक्के लोकप्रतिनिधी शेती प्रवर्गातील असून, सुद्धा आजपर्यंत यांच्या कामाचा आढावा घेत असताना, दुर्दैवी बाब आहे शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्ता करतो.

आपल्या जमापुंजी खर्च करतो, मात्र याच रस्त्याची मलाई खाण्यासाठी अधिकारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी हात मिळवणी करून परस्पर बिल काढण्याचे काम सुद्धा ग्रामीण भागातील रस्त्यांसंदर्भात होत असते, अशा प्रकारांणा आळा कसा बसणार? आधीच जिल्हा पोरका झाला असून, पालकत्व नसलेल्या जिल्ह्याला नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यथा मांडायच्या कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पांगरी नवघरे परिसरातील गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यासाठी तालुका प्रशासनाचे, तसेच जिल्हा प्रशासनाचे, मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाचे उंबरठे ओलांडून शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारणाचे घोडे मिरवणारे अनेक लोकप्रतिनिधी बघितले, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी आजपर्यंत सापडला नाही. अधिकारी फिरकायला तयार नाहीत. एक महिन्याच्या अंतरावर पावसाळा आला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेताची पेरणीसाठी तयारी करावी लागत आहे आणि आत्ताच्या यंत्रसामुग्री युगामध्ये यंत्राच्या साह्याने सर्व शेती करावी लागते, पण रस्ता नसेल, तर शेती करायची कशी ? या रस्त्यामुळे कुठे-कुठे शेतकऱ्यांच्या वादांमध्ये खुनाचे प्रकार होत असतात. जिल्ह्याच्या शेजारी असलेले अकोला जिल्ह्याचे शेत रस्त्यासाठी ऑडीट केल्या जात आहे. मग आपल्या पालकमंत्र्यांना ही बाब व जाग कधी येणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकरीच सरसावले

पांगरी येथील शेतरस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे, मात्र पावसाळा तोंडावर आला तरी कोणतीच हालचाल नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत लोकवर्गणीतून रस्ता तयार करून शासनाच्या योजनेला चपराक लगावली आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image