हॉटेल मालकांसह कामगारांवरही उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

तीन महिन्यांपासून हॉटेल बंद ः जगण्यासाठी रोजचाच संघर्ष

अकोला ः कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीचा किती आणि कसा फायदा झाला हे येणारा काळच ठरविणार आहे. मात्र, या टाळेबंदीमुळे जसा विविध क्षेत्रावर परिणाम झाला तसाच विपरीत परिणाम हॉटेल व्यावसायिक आणि त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारावरही झाला आहे. हॉटेल चक्क तीन महिन्यांपासून बंद असल्याने या कामगारांसह कारागीरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशभर टाळेबंदी करण्यात आली. अगदी दोन महिने कुठलेही क्षेत्र खुले करण्यात आले नाही. आता अनलॉक 1.0 सुरू आहे. यामध्ये विविध गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. असे जरी असले तरी हॉटेल मात्र, बंदच आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे उत्पन्न तर बुडालेच सोबतच या हॉटेलमध्ये तुम्हा-आम्हापुढे चमचमीत पदार्थ पेश करणाऱ्या त्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. आता हा व्यवसाय कधी आणि कसा सुरू होतो. हॉटेल व्यवसाय सुरू झाला तरी किती कामगारांना रोजगार मिळतो यासुद्धा संभ्रमात हे कामगार अडकले आहेत.

तीन महिन्यापूर्वी एक दोन हॉटेलमध्ये जाऊन कचोरी, समोसा आणि इतर पदार्थ बनवून देत असो. मात्र, टाळेबंदीनंतर हॉटेलच बंद पडल्या. त्यामुळे हातचा रोजगार हिरावून गेला आहे. अजुनही हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सतावत आहे.
-विलास भोपळे, कारागीर,अकोला.

तीन ते चार हजार रुपयांपासून कामाला सुरुवात केली होती. ते आता आठ ते नऊ हजार रुपये मिळत होते. मात्र, टाळेबंदीनंतर येणारे उत्पन्न थांबले. आता पेरणीचा प्रश्‍न, मुलांच्या शिक्षणासोबतच कुटुंबीयांच्या गरजा दररोज आ वासून उभ्या असतात. उत्पन्नच थांबल्याने प्रश्‍न खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत.
-सुशिल इंगळे, हॉटेल कामगार, अकोला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A time of famine on hotel owners as well as workers