अकोला : कोकणातील समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाश भास्करराव देशमुख

अकोला : कोकणातील समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू

अकोला: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर बोट अपघातात अकोल्यातील आकाश भास्करराव देशमुख (वय २७ वर्षे .रा शास्त्री नगर , अकोला) हा युवक मृत्युमुखी पडला. तो शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचा भाचा आहे.

तो बहिणीसह आई, जावयांसोबत मालवण येथे पर्यटनासाठी गेला होता. तो तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरून ‘जय गजानन’ या नावाच्या बोटीने स्कुबा डायव्हिंगसाठी निघाला होता. प्राथमिक माहितीनुसार या बोटीत २० पर्यटक होते. बोट परतीच्या प्रवासाला असताना समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बुडाली. बोट एमटीडीसी रिसॉर्टकडे निघाली होती. या दुर्घटनेत आकाश देशमुखसह पुण्यातील पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू झाला. सुदैवाने अन्य पर्यटक सुखरूप परतले.

लोकप्रतिनिधींची धाव

दुर्घटनेची माहिती मिळताच भाजपा व शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी आमदार नितीन देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी आमदार देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला. दुर्घटनेची माहिती कळताच शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला. कोकणातील शिवसेना नेत्यांनी स्थानिक प्रशासनाला पुढील सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

बोटीवर लाट आदळल्याने अपघात

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी प्रचंड लाटा उसळत होत्या. त्यातच एक लाट थेट बोटीवर आदळली. त्यामुळे बोट उलटी होऊन दोन-तीन वेळा पाण्यात फिरली. त्यात पर्यटकांच्या नाकातोंडात पाणी गेले.

मोठी बहिण, जावई वाचले!

या दुर्घटनेत आकाश देशमुख यांची मोठी बहीण अश्विनी परब व त्यांचे जावई शैलेश परब या दोघांना वाचण्यात बचाव कार्याला यश आले. मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावर परत येत असतांना शेवटच्या क्षणी हा घात झाला.

Web Title: Tourists Akola Drown Beach Konkan Sea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top