प्लाझ्मा डोनेटकडे वळणारे तुमचे एक पाऊल ठरू शकते अनेकांसाठी जीवनदान

भगवान वानखेडे 
Wednesday, 15 July 2020

जीएमसीत प्लाझ्मा बॅंक तयार ः आठ डोनरच्या 16 पिशव्या प्लाझ्मा जमा, प्लॅटिना ट्रायल सुरू

अकोला ः आत्तापर्यंत कोरोनावर कुठलीही लस उपलब्ध नसून,  आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्लाझ्मा थेरपीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांचे रक्त संकलनात आरोग्य विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा बॅंक तयार करण्यात आली असून, आतापर्यंत 8 डोनरच्या 16 पिशव्या प्लाझ्मा जमा करण्यात आआला आहे. 

 संपूर्ण विश्व हतबल झालेल्या कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही. परंतु,प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराला मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांच्या आशा वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा संकलन सुरू देखील झाली असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या आठ रुग्णांनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी जवळपास 40 बरे झालेल्या रुग्णांची यादी शासकीय रक्तपेढीने तयार केली आहे. परंतु, किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मासाठी रक्तसंकलनात आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील सर्वात मोठी अडचणी म्हणजे ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती, त्यांच्याच रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हणणे आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत दाखल बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नव्हती. त्यामुळे त्यांच्यात आवश्यक अ‍ॅन्टी बॉडिज विकसीत झालेल्या नसल्याने त्याचा फायदा प्लाझ्मा थेरेपीमध्ये शक्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

प्लाझ्मा म्हणजे काय ?
प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या 55 टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात. कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

पोलिस येत आहेत डोनर म्हणून पुढे
अकोल्यात काही दिवसापूर्वी कोरोनाने पोलिस विभागाला आपल्या जाळ्यात ओढले होते. तब्बल 18 ते 20 पोलिस कोरोना पाॅझिटिव्ह झाले होते. आता ते सगळे पोलिस कोरोनामुक्त झाले असून, काही पोलिस अधिकारी स्व खुशीने प्लाझ्मा देण्यासाठी येत आहे. त्याचप्रमाणे जनतेनेसुद्धा ही बाब आदर्श समोर ठेवून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन सर्वोपचारकडून केले जात आहे. 

कोरोनाचे रोग निदान झाल्यापासून 25 ते 28 दिवसापर्यंत ,स्वतःहून प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे.  नागपूर येथे प्लाझ्माची प्लॅटीना ट्रायल सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व मेडिकल काॅलेजाचा यामध्ये समावेश असून, सर्व मेडिकल काॅलेजमध्ये प्लाझ्मा बॅंक तयार करण्यात आली आहे. तर आपल्याकडे आता 16 पिशव्या प्लाझ्मा गोळा झाला आहे. 
-मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय, अकोला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turning to a plasma donut can be a lifeline for many