घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Two former Sarpanchs and Village Development Officers of Hivarkhed have been booked for embezzling Rs 50 lakh in various cases in Hivarkhed Gram Panchayat.
Two former Sarpanchs and Village Development Officers of Hivarkhed have been booked for embezzling Rs 50 lakh in various cases in Hivarkhed Gram Panchayat.

अकोला : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतमधील विविध प्रकरणातील एकूण 50 लक्ष रुपयाच्या अपहार प्रकरणी हिवरखेडच्या माजी सरपंच शिल्पाताई मिलींद भोपळे, ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर आणि जवळपास 5 लक्ष रुपयाच्या LED लाईट प्रकरणात माजी सरपंच अरुणाताई सुरेश ओंकारे आणि गरकल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हिवरखेड ग्रामपंचायतमधील लक्षावधी रुपयांची अफरातफर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुद्धा सुरू होते.
 
उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भीय आदेशान्वये तेल्हाराचे गटविकास अधिकारी यांनी जि.प. विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांच्या नावे पत्र लिहून तत्कालीन सरपंच शिल्पाताई मिलिंद भोपळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल या दोघांकडून फेर चौकशीत मूल्यांकनात वाढ होऊन तब्बल 50 लक्ष 43 हजार 511 एवढी रक्कमेचा अपहार चौकशीत सिद्ध झाल्याने या ५० लाखाच्या वसूलपात्र रकमेच्या वसुलीसाठी आरोपींवर फौजदारी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

सोबतच तत्कालीन दुसऱ्या माजी सरपंच अरुणाताई सुरेश ओंकारे यांच्या कार्यकाळात एलईडी खरेदी प्रकरणात जवळपास 5 लक्ष रुपये अनियमितता झाली असल्याचे चौकशीत आढळले होते.

विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांनी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या सन 2016-17 आणि सन 2017-18 च्या मंजूर आराखड्यातील कामे आणि सन 2018-19 या आर्थिक वर्षात केली व सन 2016-2017-2018 च्या कामाकरिता एकूण रक्कम एक कोटी सदोतीस लक्ष वीस हजार सातशे त्रेचाळीस रुपये बँक खात्यातून काढले. पण ग्रामपंचायत येथील मोजमाप पुस्तकामध्ये 82, 62, 914 चे मूल्यांकन प्राप्त असून एकूण 50,43,511 रुपयांची तफावत आढळली आहे.

सदर रकमेचे प्रत्यक्ष काम झालेले नाही. सदरचे शासकीय निधीचा तत्कालीन सरपंच शिल्पाताई मिलिंद भोपळे व ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांनी संगणमत करून त्याचा अपहार करुन शासनाची फसवणूक करून सदरची रक्कम स्वतःचे फायदयाकरिता वापरली अशा मजकुराची लेखी फिर्याद दिल्यामुळे हिवरखेड पोलिसांनी आरोपी शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 409 420 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार धिरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवरखेड पोलिस करीत आहेत. दोन माजी  महिलासरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हिवरखेड सह संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

एल ई डी लाईट प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल

हिवरखेड ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी लाईट खरेदी करताना खात्री न करता खोट्या दस्तावेजाच्या आधारे मे. गजानन इलेक्ट्रिकल्स पुणे यांना देयक अदा केले. त्यामुळे 4,74,779 रुपयाचे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाली. म्हणून सरपंच अरुणाताई सुरेश ओंकारे आणि ग्राम विकास अधिकारी गरकल यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार करून सदरची रक्कम स्वतःचे फायदयाकरिता वापरली अशी फिर्याद विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी दिल्याने हिवरखेड पोलिसांनी तत्कालीन सरपंच अरुणाताई सुरेश ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल  यांच्यावर भा.द.वि. 409 420 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com