Irrigation Project : अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प १६ वर्षांपासून रखडलेलेच! दरवर्षी वाढतोय कोट्यवधीचा खर्च

अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधून शेतीऐवजी शहर व औद्योगिक वस्त्यांसाठी पाण्याचा पुरवठा अधिक होत असून, २००८ साली शासनाकडून मंजूर ११ प्रकल्पांपैकी अजूनही आठ प्रकल्प रखडलेलेच.
Purna Barage Nerdharana Project
Purna Barage Nerdharana Projectsakal

अकोला - शेती व शेतकरी विकासाचे धोरण शासनाकडून व्यक्त केले जाते. मात्र, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा विकासाचा धागा म्हणजे ‘पाणी’ गुंफल्या जात नाही. अकोला जिल्ह्यात दरवर्षी ७०० ते ८०० मिमी पाऊस पडतो. मात्र, या पाण्याच्या सिंचनाची व्यवस्था मंजूर प्रकल्पांमधून अजूनही होत नसल्याची शोकांतिका आहे.

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधून शेतीऐवजी शहर व औद्योगिक वस्त्यांसाठी पाण्याचा पुरवठा अधिक होत असून, २००८ साली शासनाकडून मंजूर ११ प्रकल्पांपैकी अजूनही आठ प्रकल्प रखडलेलेच आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चात दरवर्षी कोट्यवधीची वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

जिल्ह्यात अकोला पाटबंधारे विभाग व लघु पाटबंधारे विभागाअखत्यारित ३४ मोठे, मध्यम व लघु तर, चार उपसा सिंचन प्रकल्प आहेत. त्यामध्ये अकोला पाटबंधारे विभाग अखत्यारित काटेपूर्णा व वान ही दोन मोठे प्रकल्प असून, यांची सिंचन क्षमता अनुक्रमे ८.३२५ व १४.६१८ दलघमी आहे. या व्यतिरिक्त निर्गुणा, मोर्णा, उमा ही मध्यम प्रकल्प असून, त्यांची सिंचन क्षमता १३.२४५ दलघमी आहे. पूर्णा बॅरेज हा ६.९५४ दलघमी सिंचन क्षमतेचा मध्यम प्रकल्प पूर्ण झाला असला तरी, पाणी पुरवठ्यासंबंधिचे काम अजूनही अपूर्णच असल्याने तो कार्यन्वीत झालेला नाही.

घाटा, हातोला, इसापूर, जनूना, मोहळ, मोझरी, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, सावरखेड, झोडगा, गावंडगाव, तुळजापूर, पातूर, तामसी, कसुरा, विश्वामित्री, शिवणखूर्द ही लघुप्रकल्प पूर्ण असून, यांची सिंचन क्षमता ६.३४५ दलघमी आहे. दगडपारवा, कवठा, शहापूर बृहत, नया अंदुरा ही १२.३२६ दलघमी सिंचन क्षमतेची लघुप्रकल्प मात्र अजूनही अपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त उगवा, मनात्री, निंबी व तुलंगा ही ०.८८७ दलघमी सिंचन क्षमतेची उपसा सिंचन प्रकल्प आहेत.

लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेला एकमेव उमा बॅरेज हा ५.५१ दलघमी सिंचन क्षमतेचा मध्यम प्रकल्प अपूर्णच असून, काटीपाटी, पोपटखेड टप्पा-२ व कवठा शेलू ही ३.०९१ दलघमी सिंचन क्षमतेची लघु प्रकल्प सुद्धा अपूर्णच आहेत. केवळ पोपटखेड टप्पा-१, शहापूर व वाई ही ३.९६६ दलघमी क्षमतेची तीन लघु प्रकल्प मात्र पूर्ण असल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००७ व २००८ साली जवळपास ७२८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेसह मंजूर झालेल्या व अजूनही अपूर्ण असलेल्या या आठ प्रकल्पाचा खर्च दरवर्षी दहा टक्क्याने वाढल्याने जवळपास तीन हजार कोटीच्या घरात गेला आहे.

११ पैकी ८ प्रकल्प अपूर्णच

अकोला पाटबंधारे विभाग व लघु पाटबंधारे विभागांतर्गत ११ प्रकल्पांना २००७, २००८ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. हे प्रकल्प २०१२ पर्यंत पूर्णत्वास जाऊन पाणीपुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होणे क्रमप्राप्त होते. मात्र, त्यांच्यापैकी केवळ पोपटखेड टप्पा-१, शहापूर ल.पा., वाई (सं.) ही तीन प्रकल्प पूर्ण झाले असून, उर्वरित आठ प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत.

त्यापैकी उमा बॅरेज मध्यम प्रकल्प, काटीपाटी (सं.) बॅरेज, कवठा शेलू (सं.) व पोपटखेड टप्पा-२ प्रकल्प बाधकामाधीन असून, पोपटखेड टप्पा-२ प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी, प्रकल्पाअंतर्गत शाखा, वितरिका व लघु कालव्यांचे ५० टक्के काम बाकीच आहे. उमा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ४० टक्के, कवठा शेलू (सं.) प्रकल्पाचे ४० टक्के काम अपूर्ण असून, काटीपाटी (सं.) प्रकल्पाला तर, अजून सुरुवात सुद्धा झालेली नाही ही शोकांतिका आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शोकांतिका म्हणजे, शेतकऱ्यांसाठी निर्मित प्रकल्पांमधून शहर व औद्योगिक वस्त्यांनाच मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असून, शेतीला मात्र, हंगामातही पाणी उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात २००८ साली मंजूर ११ प्रकल्पांपैकी अजूनही आठ प्रकल्प, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अपूर्णच आहेत. आतातरी उदासिनता बाजुला सारून रखडलेली सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महत्त्वाचे म्हणजे काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेतीसाठीच राखीव ठेवून, शहर व औद्योगिक वस्त्यांच्या गरजेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

- शिरीष धोत्रे, अध्यक्ष, अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समिती, अकोला

वऱ्हाडात मोठ्या प्रमाणावर असलेला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ‘पूर्णा खोरे’तील बॅरेजची कामे २००८ मध्ये सुरू झाली. ही कामे २०१२ पर्यंत पूर्ण होणार होती. परंतु, दप्तर दिरंगाईने सर्वच प्रकल्पाची कामे रखडली गेली. सिंचनाचा अनुशेष कमी होण्याऐवजी वाढत गेला. उमा नदीवरील रोहणा, पूर्णा नदीवरील नेरधामणा, काटी पाटी बॅरेजची कामे पूर्ण झाली तर, शेतीला पाणी मिळेल.

- प्रा.बबनराव कानकिरड, अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समिती, अकोला

अकोला पाटबंधारे विभागांतर्गत चार सिंचन प्रकल्प येत असून, त्यापैकी कवठा बॅरेज ल.पा. व कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) हे पूर्ण झाले असून, पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) व शहापूर बृहत ल.पा. सुद्धा पूर्णत्वास असून, केवळ पंपहाऊस व बंद नलीकेचे काम बाकी होते. त्यासाठी लवकरच निविदा काढून मार्च २०२५ पर्यंत प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न राहिल.

- अमोल वसुलीकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला

अकोला पाटबंधारे विभागांतर्गत चार सिंचन प्रकल्प येत असून, त्यापैकी कवठा बॅरेज ल.पा. व कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) हे पूर्ण झाले असून, पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) व शहापूर बृहत ल.पा. सुद्धा पूर्णत्वास असून, केवळ पंपहाऊस व बंद नलीकेचे काम बाकी होते. त्यासाठी लवकरच निविदा काढून मार्च २०२५ पर्यंत प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न राहिल.

- अमोल वसुलीकर, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला

विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष २००५ पासून कायम आहे. आघाडी सरकारने मंजूरात दिलेल्या ११ प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी २०१८ साली देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी गांधीग्रामच्या सभेत १८२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याचे काय झाले माहिती नाही, मात्र २००५ पासून अनुषेशाबरोबर सर्वच ११ प्रकल्पही अपूर्ण आहेत.

- मनोज तायडे, अध्यक्ष, काटेपूर्णा प्रकल्प समिती, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com