प्रकल्पाच्या गेटमधून पाण्याचा विनाकारण विसर्ग, गेट नादुरुस्तीमुळे प्रकल्प गाठणार लवकरच तळ

राम चौधरी 
Thursday, 20 August 2020

शिरपूरला पाणी पुरवठा करणारा तसेच शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देणारा आडोळ प्रकल्प दमदार पावसाने यंदा तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लोद्वारे पाणी वाहत आहे. मात्र मुळात प्रकल्पाचे गेट नादुरुस्त असल्याने त्यामधून विनाकारण पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्पाचे पाणी वाया जाऊन तळ गाठेल, अशी भीती शेतकऱ्यांना व नागरिकांना आहे.

शिरपूर (जि.वाशीम)  ः शिरपूरला पाणी पुरवठा करणारा तसेच शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देणारा आडोळ प्रकल्प दमदार पावसाने यंदा तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लोद्वारे पाणी वाहत आहे. मात्र मुळात प्रकल्पाचे गेट नादुरुस्त असल्याने त्यामधून विनाकारण पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्पाचे पाणी वाया जाऊन तळ गाठेल, अशी भीती शेतकऱ्यांना व नागरिकांना आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे या हेतूने तालुक्यात १८ प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यावर शेतकरी रब्बी पिके, फळ पिके, भाजीपाला आदी पिके सातत्याने घेतात. आडोळ प्रकल्पांची बोराळा येथे काही वर्षापूर्वी उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातून शिरपूर, रिसोड, रिठद अशा मोठ्या गावांना पाणीपुरवठा होतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावर शेकडो हेक्टर शेतीला सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठा वाचवून ठेवणे गरजेचे आहे. परंतु काही वर्षापासून या प्रकल्पाचे गेट नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे तुडूंब भरूनही या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. नादुरुस्त असलेल्या गेटमधून विनाकारण लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने उन्हाळ्यापूर्वीच प्रकल्पातील पाण्याची पातळी तळ गाठू लागते.

गतवर्षी देखील प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा असूनही नादुरुस्त गेटमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. पर्यायाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. या नादुरुस्त गेटची दुरुस्ती संबंधित विभागाने अजूनही केली नाही.

त्यामुळे यंदाही प्रकल्प तुडूंब भरून सुद्धा ‘दैव देते आणि कर्म नेते’, अशी स्थिती झाली आहे. नादुरुस्त गेट दुरुस्त केल्यास निश्चितच या प्रकल्पातील पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnecessary discharge of water from Akola Washim News project gate, the project will reach the bottom soon due to gate malfunction