esakal | लसीकरणाचा फज्जा; आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचा वाद
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणाचा फज्जा; आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचा वाद

लसीकरणाचा फज्जा; आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचा वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा मर्यादित पुरवठा झाल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे शनिवारी (ता. १) दुपारी महानगरातील अवघ्या ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर किमान दीडशे नागरिकांना लस दिली जाणार होती. परंतु लसीकरणासाठी पोहचलेल्या बहुतांश नागरिकांना ऑनलाईन अपॉईंटमेंट न मिळाल्यानंतर सुद्धा ते लसीकरण केंद्रांवर पोहचले. यावेळी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ज्यांना ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळाली आहे त्यांनाच लस देण्यात येईल, असे दुपारी १ वाजतानंतर सांगण्यात आले. परिणामी सकाळपासूनच लसीच्या प्रतीक्षेत रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांचा लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत शाब्दीक वाद झाला. परिणामी लसीकरणाचा पाचही केंद्रांवर पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला.

वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे शनिवार (ता. १ मे) पासून लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यासाठी जिल्ह्यास ७ हजार ५०० कोव्हीशिल्ड या लसीचे डोज सुद्धा उपलब्ध झाले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भरतीया रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय (डाबकी रोड), आर.के.टी. आयुर्वेद कॉलेज जठारपेठ आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी या वयोगटाताली नागरिकांची गर्दी उसळली. अनेक नागरिक सकाळी ९ वाजतापासूनच लसीकरणासाठी केंद्रावर पोहचले.

परंतु लसीकरणाला प्रत्यक्षात दुपारी १ वाजता सुरूवात होणार होती. त्यामुळे १ वाजेपर्यंत सर्वच लसीकरण केंद्रांवर ४०० ते ५०० पेक्षा अधिक नागरिक जमा झाल्याचे दिसून आले. परंतु लसीकरण सुरू करण्याच्या आधी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ज्यांना ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळाली आहे. त्यांचेच लसीकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. परिणामी तब्बल ४ ते ५ तासापासून लसीकरण केंद्रावर प्रतीक्षेत उभ्या असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला व त्यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.

कोठे काय आढळले

- जुने शहरातील डाबकी रोड वरील कस्तुरबा गांधी रुग्णालयात १ मे रोजी दुपारी १ वाजतानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होणार होते. परंतु अनेक लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी ‘कोविन’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केले नाहीत. काही लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज परंतु त्यांना लसीकरणासाठी वेळ मिळाली नाही अशा लाभार्थ्यांना लस देता येणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे तुम्ही लसीकरण करून देत नसाल तर तसे लेखी आम्हाला द्या, असा हट्ट काही नागरिकांनी पकडला. नागरिकांचा कस्तुरबा गांधी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शाब्दीक वाद झाला. यावेळी काही लाभार्थ्यांनी आक्रमकता दाखवल्यामुळे रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाचे प्रवेशद्वार बंद केले. बराच वेळ कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद झाल्याने रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली. दुपारी २ वाजतानंतर या ठिकाणी लसीकरण सुरू झाले.

- स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ मे रोजी सकाळी १० वाजता पासूनच जवळपास ५०० लाभार्थ्यांची गर्दी जमली व लांबच लांब रांगा लागल्या. ज्या लाभार्थ्यांनी ‘कोविन’ संकेतस्थळावर लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केली व ज्यांना वेळ मिळाली असेल अशा लाभार्थ्यांना लस देण्यात येईल अशी माहिती दुपारी १ वाजता या ठिकाणी देण्यात आली. त्यामुळे सकाळ पासून लसीच्या प्रतीक्षेत रांगेमध्ये उभ्या असलेल्या नागरिकांची घोर निराशा झाली. त्यांनी लसीकरण केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना याविषयी जाब विचारला. प्रश्न विचारणारे लाभार्थी अधिक व उत्तर देणारे कर्मचारी कमी असल्यामुळे या ठिकाणी लसीकरनापूर्वी थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व गोंधळामध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होऊ शकले नाही.

- टिळक रोडवरील किसणीबाई भरतीया केंद्रावर सुद्धा ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सुद्धा अपॉईंटमेंटचा मेसेज न आलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रतील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिली. याठिकाणी सुद्धा १८ वर्षावरील नागरिकांची लसीकरणासाठी मोठी रांग लागली होती. वेळेवर लसीकरण होणार नसल्याचे समजल्याने नागरिकांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यावेळी अपॉईंटमेंटचा मेसेज आलेल्यांचे लसीकरण करण्यात आले तर इतरांना परत पाठवण्यात आले.

- आर.के.टी. आयुर्वेद कॉलेज जठारपेठ आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सुद्धा १ मे रोजी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. ऑनलाईन मेसेज मिळालेल्यांचेच याठिकाणी लसीकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

पहिल्या दिवशी केवळ ३६३ लाभार्थ्यांनीच घेतली लस

शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर १ मे रोजी वय वर्षे १८ ते 44 या वयोगटातील केवळ ३६३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. याव्यतिरिक्त ६० वर्षांवरील ७६१ लाभार्थ्यांनी लस घेतली, ४५ ते ५९ वयोगटातील १ हजार १२६ लाभार्थ्यांनी तर ७२७ इतर लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतल्यामुळे शनिवारी (ता. १) जिल्ह्यात दोन हजार ३७७ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image