esakal | लस संपल्यामुळे लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट

बोलून बातमी शोधा

लस संपल्यामुळे लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट
लस संपल्यामुळे लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील १५१ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे, परंतु गुरुवारी (ता. २९) कोरोनाची लस संपल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मोहिमेत खंड पडला. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्रावर पोहचलेल्या लाभार्थ्यांना निराश होत परत जावे लागले.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असल्याने लशींचा नेहमिच तुटवडा सुद्धा जावणत आहे. दरम्यान गुरवारी (ता. २९) अकोला शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहीम ठप्प पडल्याचे दिसून आले. लसच उपलब्ध नसल्याने लस मिळाल्यावर लस देण्यात येईल, असे फलक बहुतांश केंद्रांच्या बाहेर लावण्यात आले होते.

एक लाख ९५ हजार लाभार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत एकूण १ लाख ९५ हजार २५० लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामध्ये पहिला डोज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ६१ हजार ४७१ तर दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या ३३ हजार ७७९ आहे.

कोव्हिशील्डला पसंती

जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणात सर्वाधिक १ लाख ६१ हजार ३२२ लाभार्थ्यांनी कोव्हिशील्डची लस घेतली. तर ३३ हजार ९३८ लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधितक पुरवठा कोव्हिशील्डचा झाल्याचे लक्षात येते.

६० वर्षावरील ७५ हजार लाभार्थ्यांनी घेतली लस

वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टरांच्या नंतर जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात ज्येष्ठांचा लसीकरणाला अल्प उत्साह होता. परंतु नंतर मात्र त्यांचा उत्साह वाढला. त्यामुळे आतापर्यंत ६० वर्षावरील ७५ हजार १२७ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रावरील लशींचा साठा संपला आहे. त्यामुळे काही केंद्र वगळता इतर केंद्रातून गुरुवारी (ता. २९) लस देण्यात आली नाही. लस उपलब्ध होताच लसीकरण सुरू करण्यात येईल.

- डॉ. सुरेश आसोले,

जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर