बांधकामाने अडविली शिक्षणाची वाट | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

अकोला : बांधकामाने अडविली शिक्षणाची वाट

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर : महामार्गावरील पुलाच्या बांधकामामुळे शाळेचा रस्ता बंद असून, शाळेत जाता येत नसल्याने शेकडो विद्यार्थी रस्ता नसल्याने घरीच आहेत. दोन महिन्यांपासून विद्यार्थी घरीच असल्याने त्यांचे शिक्षण बुडाले आहे. गत दोन महिन्यांपासून अकोला-खामगाव या राष्ट्रीय मार्गावरील पुलाचे काम बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे सुरू आहे.

पुलाखालून रिधोरा-खिरपुरी रस्ता असून, या रस्त्यावर विद्यालय आहे. विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दररोजचे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत पाहिल्यास कुणालाही कळवळा येईल अशी, अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे. पुलाचे काम सुरू असल्याने लोखंडी सळई, बार ओलांडत विद्यार्थी शाळेची वाट धरत आहेत.

विद्यार्थ्यांना पर्यायी रस्ता नसल्याने प्रशासन व कंत्राटदारांना याप्रश्नी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या कामामुळे रस्ता बंद असल्याने रिधोरा गावतील अनेक विद्यार्थी शाळेतच जात नसल्याचाही धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. शाळातील स्थिती पूर्वपदावर येत असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महामार्गाच्या पुलाचे काम अडसर ठरत आहे.''

काम बेतू शकते विद्यार्थ्यांच्या जीवावर

महामार्गावरील पुलाच्या बांधकामाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. चाळीस फूट उंचीचा हा पूल असून, त्याखालून रिधोरा-खिरपुरी रस्ता आहे. पलीकडे जायचे तर, हा महामार्ग ओलांडूनच जावे लागते. स्त्यावरून वर चढण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून बोलल्या जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चाळीस फूट उंच चढून व तेवढेच अंतर खाली उतरावे लागणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीताची जबाबदारी कोण घेणार? असे, अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत.

संबंधित अभियंत्यांकडून टोलवाटोलवी

या संदर्भात ईगल इन्फ्रा कंपनीचे नंदलाल लिहारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत उडवा-उडवीची माहिती दिली आहे. त्यानंतर सहायक अभियंता अमीत राजपूत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी याबाबत टोलवाटोलवी केली.

कंत्राटदारांवर कारवाईची मागणी

महामार्गावरील पुलाचे बांधकाम ईगल इन्फा कंपनीकडे आहे. पुलाचे बांधकाम सुरू करताना कंत्राटदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार केला नाही व विद्यार्थ्यांच्या शाळेची वाट अडवून धरली. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांंवर कारवाई करण्याची मागणी पालक करीत आहेत.

loading image
go to top