पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा वीज खांबावर मृत्यू; दुरुस्तीचे काम करताना लागला शॉक 

A water supply worker in Sakharkheda died after climbing a power pole on Tuesday
A water supply worker in Sakharkheda died after climbing a power pole on Tuesday

साखरखेर्डा (बुलडाणा) : विद्युत पुरवठा खंडित न करता वीज प्रवाह सुरु असतानाच एका लाइनमनने ग्रा. पं. कर्मचार्‍याला विद्युत खांबावर चढवले. परिणामी वीज पुरवठा सुरू असल्याने सदर ग्रा. पं. कर्मचार्‍याचा विद्युत खांबावर विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. सदरची घटना मंगळवारी (ता.१६) सकाळी मलकापूर पांग्रा येथे घडली. या घटनेतील दोषी लाइनमनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असल्याचे कळते. 

मलकापूर पांग्रा येथील भगवान साळवे यांचे शेतात सकाळी सदर घटना घडली. साखरखेर्डा रस्त्यावरील कायंदे यांच्या डीपी जवळील शेतात भगवान साळवे यांच्या शेतातील मुुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने विजेचा धक्का लागल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत लाइनमनही होते परंतु, सदर घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती गावात कळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. जोपर्यंत कर्मचार्‍याच्या नातेवाइकांना महावितरणकडून अर्थसाह्य आणि लाइनमनविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली. त्याची दखल घेत साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी लाइनमनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 

घटनेनंतर तीन तासांनी खांबावरून मृतदेह खाली उतरून नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मलकापूर पांग्रा येथील विश्वंभर श्रावण मांजरे (वय ५० वर्ष) हे ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी असून वीज दुरुस्तीची कामे करतात. विश्वंभर मांजरे यांना गावात सर्वजण डॉक्टर म्हणून ओळखतात. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान लाइनवर बिघाड झाला होते तो दुरुस्ती करायची आहे. म्हणून लाइनमन प्रशांत देशमुख यांनी विश्वंभर मांजरे यांना नेले.

लाइनमनला खांबावर चढता येत नसल्याने त्यांनी श्री. मांजरे यांना खांबावर चढवले. त्यासाठी लाइन बंद करण्याचा सबस्टेशन मधून परवाना घेतला. मात्र, अचानकच वीज पुरवठा सुरू झाल्याने विश्‍वंभर मांजरे यांना विजेचा धक्का बदला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि त्याला आर्थिक मदत करा अशी मागणी केली. त्यासाठी रस्त्यावर एक तासभर रास्ता रोको करण्यात आला. 

यावेळी सरपंच भगवान उगले, माजी सरपंच अहमद यारखा पठाण, गुलशेरखासाब, बंडू उगले, राजू साळवे यांच्यासह गावकर्‍यांनी तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. तर मृतकाच्या नातेवाइकांसह लाईनमनला आमच्यासमोर हजर करा अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली. यावेळी घटनास्थळी प्रचंड गर्दी होत असल्याने ठाणेदार आडोळे यांनी पोलिसांचा फौजफाटा मागविला. घटनेनंतर तीन तासाने महावितरण कंपनीचे अभियंता ए. एम. खान यांनी घटनास्थळी येऊन संबंधित दोषी लाइनमन विरुद्ध तात्काळ निलंबन करू आणि मृतकाच्या नातेवाइकांना मदत करू असे ठोस आश्वासन दिल्याने पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरण्याचा आला.

त्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी विलास यारावर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि ठाणेदार आडोळे यांना कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. याबाबत मृतकाचा भाऊ नंदू मांजरे यांनी तक्रार दिल्याने लाइनमनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. दुपारनंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी बिबी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी पोस्टमार्टमसाठी बीट जमदार नारायण गीते, विशाल बनकर, राजू मापारी यांनी मृतदेह पाठविला. 

अख्खे गाव हळहळले

ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर मांजरे हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. ग्रामस्थांशी त्याचे सलोख्याने संबंध होते. रोज अवघ्या गावाला पाणी पाजायचे काम करायचा कुणी डॉक्टर आज आमच्याकडे नळ येणार आहेत कांं? असे विचारल्यावर हो ताई येणार आहे असे सांगून प्रत्येकाशी संयमाने बोलायचा, कधी कोणाच्या घराचे लाइट चे काम केले तर कोणी पैसे दिले तर घ्यायचा अन्यथा नाही अशा प्रामाणिक आणि मनमिळाऊ स्वभावाचा डॉक्टर अचानक गेल्याने अख्खा गाव हळहळला प्रत्येक समाजातील महिलांनी जणूकाही आपल्या घरातील व्यक्ती गेली अशी भावना व्यक्त करत शोक व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com