Akola : बोरगाव मंजूमध्ये आढळला शस्त्रसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बोरगाव मंजूमध्ये आढळला शस्त्रसाठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : बोरगाव मंजू येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह शस्त्र बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्यात.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बोरगाव मंजू येथील रहेमत नगर येथील रहिवासी सलीम शहा शब्बीर शहा याच्या घराची झाडाझडती घेतली. तेव्हा घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.

घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, एक लोखंडी गुप्ती, तीन धारदार लोखंडी तलवारी, एक धारदार लोखंडी फोल्डिंग चाकू, एक धारदार लोखंडी कोयता, एक लोखंडी भाल्याचे टोक, एक लोखंडी फायटर, भरमार बंदुकीच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे तीन लोखंडी आणि एक स्टील रॉड, भरमार बंदुकीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी छर्ये, धातूचे तुकडे, गनपावडर, भरमार बंदुकीमध्ये दारुगोळा ठासून भरण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा लोखंडी रॉड आणि वन्यजीवमध्ये येणाऱ्या काळविटाचे शिंग मिळून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन सलीम शहा शब्बीर शहा (३२) आणि साबीर शहा शब्बीर शहा या दोन भावंडाना अटक केली.

त्यांच्या विरोधात बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीन, चार, २५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, ए.एस.आय.दशरथ बोरकर, गोकुल चव्हाण, स्वप्नील खेडकर, लीलाधर खंडारे, अन्सार, महिला पोलिस कॉन्स्टेबल जोत्स्यना लव्हाळे यांनी केली.

loading image
go to top