Yavatmal : विहिरीत ढकलून देत पतीने केला पत्नीचा खून Yavatmal Husband kills wife pushing her into | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

Yavatmal : विहिरीत ढकलून देत पतीने केला पत्नीचा खून

यवतमाळ : संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या एका व्यक्तीने पत्नीला पिण्याचे पाणी आणण्याच्या बहाण्याने नेत विहिरीत ढकलून ठार केले. समाजमन सुन्न करणारी निर्घृण खुनाची ही गंभीर घटना गुरुवारी (ता.दोन) रात्री आठ वाजताच्या सुमारास कळंब तालुक्यातील शरद (येरद) शिवारात घडली.

पूजा राहूल मेश्राम (वय२५) असे विहिरीत ढकलून देत ठार करण्यात आलेल्या विवाहितेचे तर राहुल उद्धव मेश्राम (३२) असे तिला ठार करणार्‍या आरोपी पतीचे नाव आहे. पुजाचे गावातीलच एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी राहुल याला होता. त्यातूनच तो अनेकदा तिच्याशी भांडण करायचा.

तिला मारहाणही करायचा. त्यातच त्याने पुजाचा कायमचा काटा काढण्याचे मनोमन ठरविले होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर काही वेळाने त्याने पुजाला पाणी आणण्याच्या बहाण्याने गावातील विहिरीवर नेले.

विहिर परिसरात कुणीच नसल्याची संधी साधून तिला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात श्‍वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मी नव्हेचची भूमिका घेत आरोपी राहुल घरी परतला. पूजा बेपत्ता असल्याचा गवगवा करीत या घटनेला त्याने आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी पुजाचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. वडील जगदीश गजभिये यांनी या प्रकरणी कळंब पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी पती राहूल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.