Yavatmal Washim Loksabha Election Result : भाजपच्या गडात उबाठाची मुसंडी; पालकमंत्र्यांचे पालकत्वही ठरले कुचकामी

महायुतीचा उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाचे पालकत्व घेणाऱ्या पालकमंत्र्यांना आपल्याच मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची लिड रोखता आली नाही.
Yavatmal Washim Loksabha Election Result
Yavatmal Washim Loksabha Election Resultsakal

वाशीम - लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मुसंडी मारल्यानंतर या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात मिळालेली बढत या विधानसभेच्या आमदारांसाठी आत्मपरीक्षण करणारी ठरली आहे.

महायुतीचा उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाचे पालकत्व घेणाऱ्या पालकमंत्र्यांना आपल्याच मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची लिड रोखता आली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीआधीच या धास्ती वाढली आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगला. या राजकीय लढाईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना ९४ हजारांवर मतांनी मात देत हा मतदारसंघ सर केला. मात्र आता निकालानंतर महायुतीच्या ताब्यातील मतदारसंघात संजय देशमुख यांना मिळालेले मताधिक्य चर्चेचा विषय ठरला आहे.

या मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील वाशीम व कारंजा हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या दोनही मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार लखन मलिक करतात. या मतदारसंघात वाशीम व मंगरूळपीर तालुक्याचा समावेश आहे. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय देशमुख यांनी ३९ हजार ७३९ मतांचे मताधिक्य मिळविले आहे.

चार महिन्यांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार लखन मलिक यांना देशमुख यांचे मताधिक्य चिंतन करण्यास बाध्य करणारे आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्यानंतर पाटणींचे चिरंजीव ज्ञायक पाटणींनी या मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती.

मात्र या मतदारसंघात संजय देशमुख यांनी २० हजार ९६२ मतांचे मताधिक्य मिळविले आहे. या दोनही मतदारसंघात संजय देशमुख यांना मिळालेले मताधिक्य जिल्ह्यातील भाजप संघटन कौशल्याचाच पराभव असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

भाजपमधील असमतोल शिंदे सेनेला भोवला

या मतदारसंघात शिंदे सेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराची भिस्तच भाजपवर होती. मात्र जिल्ह्यातील भाजपमधे असलेली चढाओढ शिंदे सेनेच्या उमेदवाराला ओळखता आली नाही. शहरी भागातील नेत्यांनी ग्रामीण भागाचा भार उचलण्याचा आव आणला तर ग्रामीण भागात पोहच असलेल्या नेत्यांना व्यासपीठावर खुर्चीही मिळू नये हा खटाटोप केला गेला.

दुसरीकडे भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना साधनसामग्रीच मिळाली नसल्याचा आरोप चक्क समाजमाध्यमावर करण्यात आला. याही परिस्थितीत बाहेर जिल्ह्यातील वास्तव्य असलेल्या शिंदेसेनेच्या उमेदवार यांना पंधरा दिवसात मिळालेली लक्षणीय मते आपलीच असल्याचा दावा भाजप पक्षसंघटेत होत असताना मोठ्या नेत्यांची छोटी कामगिरी पक्षसंघटनेत चिंतनाचा विषय ठरेल का? हा प्रश्नच आहे.

पालकत्व घेतले मग मताधिक्य का नाही?

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात खासदार भावना गवळी यांच्याऐवजी कोणताही उमेदवार द्या, त्याला निवडून आणणार, असे चॅलेंज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी घेतल्याची चर्चा होती. शिंदेसेनेने हा बदलही केला, मात्र पालकमंत्री संजय राठोड यांना पालकत्व पत्करलेल्या जिल्ह्यातच नव्हे तर स्व:तच्या मतदासंघातही राजश्री पाटील यांना मताधिक्य देता आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com